Kalyan Crime : दुर्मिळ पोपटांची विक्री करणाऱ्या एकाला अटक, ४ दुर्मिळ पोपटांची सुटका

| Updated on: Oct 21, 2023 | 12:39 PM

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारत ४ दुर्मिळ पोपटांची सुटका केली. तसेच याप्रकरणी दुकानदाराला ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

Kalyan Crime : दुर्मिळ पोपटांची विक्री करणाऱ्या एकाला अटक, ४ दुर्मिळ पोपटांची सुटका
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 21 ऑक्टोबर 2023 : कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारांचा (kalyan crime) उपद्रव प्रचंड वाढला आहे. रोज गुन्ह्याच्या काही ना काही घटना कानावर पडतच असतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले असून ते अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. दरम्यान कल्याण शहरात पश्चिमेकडे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने दुर्मिळ पोपटांची विक्री होत आहे.

खबऱ्याकडून याची माहिती मिळताच कल्याण वनविभागाने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कल्याण रामबाग परिसरात छापा मारत ४ दुर्मिळ पोपटांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार आकाश गजधाने याला ताब्यात घेतले. त्याला कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आकाशची कसून चौकशी करत अधिक तपास करत आहेत.

अशी केली कारवाई

कल्याण पश्चिमेकडे रामबाग परिसरात बालाजी पेटस नावाचे दुकान आहे. या दुकानात दुर्मिळ पोपट विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर छापा टाकला आणि तेथून चार पोपट हस्तगत केले. तसेच या दुकानाचा मालक आकाश गजधाने याला अटक केली. कोर्टाने आकाश गजधाने याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे .

या दुकानात रोजरिंग पॅराकिट या प्रजातीचा पोपट आढळला, जो अतिशय दुर्मिळ आहे. त्यांची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे, हे माहीत असूनही दुकानदार आकाश गजधाने याने हे पोपट विकण्यासाठी आणले होते. वन विभागाचे अधिकारी शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. दरम्यान नागरीकांनी वन्य जीव पाळू नयेत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.

पोपटांची विक्री केल्यास कोणती शिक्षा ?

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारणा २०२२ च्या कायद्यानुसार पोपटांची विक्री करणे किंवा जवळ बाळगणे या करीतातीन वर्षा पर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा १ लक्ष दंडाची अथवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे. तरी वन विभागाकडून आवाहन करण्यात येते की,कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री, त्यांच्या नैसर्गिक अधिवासास इजा पोहचविणे किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. तसे कोणी केल्याचे आढळले तर संबधितांविरूध्द तात्काळ कारवाई करण्यात येऊ शकते.