सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 19 ऑक्टोबर 2023 : कल्याणमध्ये ( kalyannews) गुन्ह्यांच्या वाढत्या घटनाने नागरिक भयभीत झाले आहे. पोलिसांचा वाढता पहारा, गस्त असूनही गुन्हेगार सर्रास हैदोस घालत फिरत आहेत. त्यातच एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याच्या प्रयत्नात लुटारूने तिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना काल उघडकीस आली. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा कसून शोध सुरू केला. अखेर ही चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या घटनेनंतर अवघ्या सहा तासांत कारवाई करत खडकपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्विन सदाफुले असे आरोपीचे नाव असून हातातला जॉब सुटल्यानंतर पोटासाठी त्याने हा वाममार्ग निवडल्याचे पुढे आले. आर्थिक चणचणीतून ही चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.
नेमकं काय घडलं होतं ?
कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रिया सावंत असे पीडित महिलेचे नाव आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. त्यावेळी ती फोनवर बोलत होती. मात्र मोहन कॉलनी ऑफीसर क्वॉर्सजवळ आल्यानंतर एका अज्ञात इसम अचानक तिच्या मागून आला. त्याने त्या महिलेच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेने त्याला रोखत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीमुळे चोरट्याने धारधार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. गळा, हात, पोट, मान आणि पाठीवर वार झाल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. हे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला. त्या महिलेला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे.
खडकपाडा पोलिसांनी केली कारवाई
महिलेवर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पसार झाला. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ acp कल्याणजी घेटे व खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली अनिल गायकवाड, शरद झिने नंदकुमार कैचे यांनी तपास सुरू केला. या पोलीस अधिकाऱ्यांनी अवघ्या सहा तासांमध्ये कल्याण मोहने परिसरातून अश्विन सदाफुले याला बेड्या ठोकल्या.
आर्थिक चणचणीतून केला गुन्हा
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी अश्विन याची कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अश्विन हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी त्याचा जॉब गेला. हातातील नोकरी गेल्याने तो बेरोजगार झाला आणि आर्थिक चणचण जाणवू लागली. त्यामुळे तो या वाममार्गाला लागला. त्याचा हा चोरीचा पहिलाच गुन्हा होता, मात्र पहिल्या प्रयत्नातच तो पकडला गेला. पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.