सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 4 डिसेंबर 2023 : आई आणि अवघ्या सात वर्षांच्या लहान मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरलं. दीपक गायकवाड या बिझनेसमनने त्याची पत्नी आणि लहान मुलाची हत्या केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली. हत्याकांडानंतर आरोपी गायकवाड फरार झाला. अखेर पोलिसांनी 250 किलोमीटर त्याचा पाठलाग करून संभाजीनगर परिसरातून त्याला बेड्या ठोकल्या. महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक अभ्यास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा पाठलाग करत ही कारवाई केली आणि आरोपीला अटक केली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नीच्या हत्येनंतर मुलाला कोण सांभाळणार, असा विचार आल्याने त्याने अवघ्या सात वर्षांच्या मुलालाही संपवलं. दोघांच्या हत्येनंतर त्याने स्वत:चही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते धाडस न झाल्याने अखेर घर बंद करून तिथून पळ काढला. या संपूर्ण घटनेने शहरात प्रचंड खळबळ माजली असून या हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करा अशी मागणी करत मृताच्या कुटूंबियांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्या बाहेर मोठी गर्दी केली.
गुंतवणूकदारांची फसवणूक करून आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण महात्मा फुले गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 250 किलोमीटर पाठलाग करून संभाजीनगर दीपक गायकवाड याला येथून अटक केली. गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करून आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. पत्नीच्या हत्येनंतर मुलाचं काय होणार हा विचार करून त्याने चिमुकल्यालाही संपवलं. नंतर त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते धाडस झालं नाही आणि तो घरातून पळाला. पणर तांत्रिक अभ्यास व माहितीदारांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात अडकला
कर्जबाजारी झाल्याने घरात वारंवार भांडणं
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. दीपक गायकवाडने आपल्या पत्नीला व सात वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली आणि पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि क्राईम पी आय प्रदीप पाटील यांनी पीएसआय तानाजी वाघ पीएसआय भिसे पोलीस हवालदार चित्ते , पोलीस नाईक सूर्यवंशी , रामेश्वर गामणे , थोरात , कागरे , वडगावे अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले. आणि आरोपी गायकवाड याचा पाठलाग करण्यास सांगितले. कल्याण वरून निघालेल्या या पोलिसांच्या पथकाने अखेर संभाजीनगर परिसरात टोलनाक्यावर आरोपी गायकवाड याला बेड्या ठोकून अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार दीपकने कल्याणमध्ये फायनान्स कंपनी सुरू केली होती. यात लोकांनी करोडो रुपये गुंतवले होते. मात्र त्यात त्याचे बरेच नुकसान झाले. कर्जबाजारी झाल्याने वारंवार घरात भांडण होत होती आणि याच कारणाने त्याने अखेर आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली त्या नंतर मुलाचं काय होणार हा विचार करून 7 वर्षीय मुलांचीही हत्या केली. दोघांच्या हत्येनंतर त्याने त्याचं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला, पण धाडस न झाल्याने घर बंद करून पळ काढला. अखेर तांत्रिक अभ्यास व माहितीदाराच्या मदतीने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.