सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 9 फेब्रुवारी 2024 : कल्याण – डोंबिवली परिसर सध्या गुन्ह्यांच्या घटनांनी हादरला आहे. गेल्या आठवड्यातच उल्हासनगमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला. यामुळे तणावाचं वातावरण असतानाच आता कल्याणमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरीक घाबरले आहेत.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा सर्कल येथे भर रस्त्यात असलेल्या मणप्पूरम गोल्ड फायनान्स बँकेसह दोन मेडिकल दुकानाचे शटर उचकटत चोरी करण्यात आली. काल रात्रीच्या सुमारा ताही चोरांनी मणप्पूरम गोल्ड फायनान्स बँकेचं शटर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोल्ड फायनान्स बँकेत सुरक्षा अर्लाम असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून तातडीने पळ काढला. पण त्यानंतर ते काही अंतर पुढे गेले आणि तेथे असलेल्या दोन मेडिकल दुकानांचे शटर उचकटून तेथील रोख रक्कम आणि दुकानातील अनेक वस्तू घेऊन त्यांनी पळ काढला.या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण झोन तीन पोलिसाचे डीसीपी एसीपी सह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करत गुन्हा नोंद करण्याचा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या घटनेने व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून संबंधित दुकान चालक व फायनान्स कंपनीचे मॅनेजर घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत.