Dombivli Crime : दुकानात सामान घ्यायला गेले अन् हमरीतुमरीवर आले.. थेट दगडफेक करण्यापर्यंत तरूणांची मजल का गेली ?

| Updated on: Nov 01, 2023 | 9:19 AM

तरूणांच्या या कृत्यामुळे तिघे जण गंभीर जखमी झाले असून आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात चार जाणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

Dombivli Crime : दुकानात सामान घ्यायला गेले अन् हमरीतुमरीवर आले.. थेट दगडफेक करण्यापर्यंत तरूणांची मजल का गेली ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 1 नोव्हेंबर 2023 : कधी चालताना धक्का लागल म्हणून तर कधी गाडीचा कट लागला म्हणून, छोट्या-मोठ्या गोष्टींवरून राग डोक्यात घालून भांडणं, मारामारी करणाऱ्यांची संख्या आजघडील खूप वाढली आहे. कल्याणमध्येही असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका दुकानात सामान आणायला गेलेल्या तरूणांनी दुकानातील महिला, मुलगी आणि एका पुरूषाला बेदम मारहाण करत त्यांच्या दुकानावर दगडफेक करून सामानाचीही मोडतोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मात्र या भांडणामागचं कारण ऐकून तर सर्वच हैराण झाले आहेत. फक्त उधारीवर सामान मिळालं नाही या कारणाने त्या मस्तवाल तरूणांनी हे कृत्य तर केले. ही दगडफेक आणि मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेला असलेल्या अडवली ढोकाळी परिसरात मोदी राशन भंडार किराणा व जनरल स्टोअर दुकान आहे. 29 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गौतम उर्फ भोला सिंग ,अभिषेक गुप्ता, गोलू व अशु नावाचे चार तरुण या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ते सामान उधारीवरती मागितले. पण दुकानातील महिला कुसुम महेश सिंग यांनी उधारीवर सामान देण्यास नकार दिला. त्यामुळे हे चौघेही संतापले आणि त्यांनी त्या महिलेला शिवीगाळ करत भांडण्यास सुरूवात केली. दुकानातील आवाज ऐकून
त्यामागेच असलेल्या घरातून कुसुम यांची मुलगी आणि त्यांचा दीर दुकानात आले आणि त्यांनी भांडण थांबवण्याचा, त्या तरूणांना रोखण्याचा प्रयत्न केला.

पण संतापलेल्या त्या चौघाही तरूणांनी ती महिला, तिची मुलगी आणि दीर या तिघांनाही बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांनी दगडफेक करत अख्खं दुकान फोडलं, सामानाचीही मोडतोड केली. ती महिला आणि इतर दोघांवरही दगडफेक केली. संपूर्ण अर्धा तास त्यांचा हा गोंधळ सुरू होता. अखेर त्या तिघांनी कसाबसा जीव वाचवला आणि मानपाडा पोलीस स्टेशन गाठत त्या चारही तरूणांविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी त्या महिलेची तक्रार नोंदवून घेत त्या चारही तरूणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.  मात्र मारहाण आणि दगडफेकीच्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीवचे वातावरण आहे.