Kalyan Crime : विशाल गवळी हातात पिशवी घेऊन सलूनमध्ये शिरला, तितक्यात तोंडाला मास्क लावलेला एक… अटकेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; काय दिसलं?

| Updated on: Dec 26, 2024 | 11:58 AM

कल्याणमधील भीषण बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून अटक केली आहे. त्याची पत्नी साक्षीची कबुली आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना त्याला अटक करण्यास मदत झाली. फुटेजमध्ये विशालला बेफिकीरपणे सलूनमधून बाहेर काढताना दाखवले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.

Kalyan Crime : विशाल गवळी हातात पिशवी घेऊन सलूनमध्ये शिरला, तितक्यात तोंडाला मास्क लावलेला एक... अटकेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; काय दिसलं?
आरोपी विशाल गवळीच्या अटकेचं सीसीटीव्ही फुटेज समोर
Image Credit source: tv9
Follow us on

बीड आणि परभणीच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं असतानाच आता कल्याणच्या घटनेनेही महाराष्ट्र हादरून गेला आहे. कल्याणमध्ये विशाल गवळी या आरोपीने एका चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. या हत्येनंतर त्याने मित्र आणि पत्नीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि बुलढाण्याच्या शेगावमध्ये पळून गेला. पोलिसांनी त्याला शेगावमधून अटक केली आहे. पोलिसांनी थेट शेगावमध्ये जाऊन त्याला मोठ्या शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी विशालला अटक केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. यात विशाल अत्यंत आरामात असल्याचं दिसून येत असून त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा भाव नसल्याचंही दिसत आहे.

विशालच्या कल्याणच्या घराबाहेर रक्ताचे डाग सापडल्यानंतर पोलिसाचा त्याच्यावर संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याची बायको साक्षी हिला अटक केली. साक्षीची उलट तपासणी करताच तिने गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. त्यानंतर पोलिसांनी थेट शेगाव गाठत विशालच्या मुसक्या आवळल्या. त्याचाच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.

सीसीटीव्हीत काय दिसलं?

हे सुद्धा वाचा

हा सीसीटीव्ही फुटेज अत्यंत क्लिअर आहे. यात विशालच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहे. विशाल शेगावमधील एका जेन्ट्स पार्लर (सलून)मध्ये येताना दिसतो. त्याच्या हातात एक पिशवी आहे. ती पिशवी तो बाजूलाच ठेवतो. त्यांच्या अंगात टी शर्ट आणि जीन्स आहे. त्यानंतर तो दाढी आणि कटिंग करण्यासाठी खुर्चीवर बसतो. त्याची दाढी झाल्याबरोबर एक पोलीस तोंडाला रुमाल बांधून आत येतो. पोलिसाने निळा टीशर्ट आणि जीन्स घातली होती. पोलीस आत आल्यावर विशालची खुर्ची फिरवतो. विशालचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवतो.

त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल होते. विशालला पोलीस सोबत येण्याची विनंती करतात. पण विशाल काही उठायचं नाव घेत नाही. तेवढ्यात गणवेशातील पोलीस आत येतो. पुन्हा बोलचाल सुरू होते. पण विशाल काही उठत नाही. मग आधी आलेला पोलीस विशालची खुर्ची जोराने ओढतो, विशालला उठवण्याचा हा प्रयत्न असतो. त्यानंतर विशाल उठतो. विशाल पळून जाऊ नये म्हणून दोन्ही पोलीस त्याला कडं करतात आणि त्याला बाहेर नेतात. यावेळी विशालच्या चेहऱ्यावर भीती, पश्चात्ताप काहीच दिसत नाही. सलूनमध्ये लोकही काय घडतंय हे वळून वळून पाहताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

विशालसह पत्नीला पोलीस कोठडी

दरम्यान, विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी हिला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण कुठून केलं? तिची हत्या कशी झाली? तिला कशा प्रकारे मारलं? त्याला या प्रकरणात मदत करणारे आणखी कोणी आहेत का? त्याने हत्या करण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं? मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली? या सर्वांचा तपास करायचा असल्याने त्याची पोलीस कोठडी द्यावी, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.