कल्याण : एक्स्प्रेस ट्रेनमधून सुरु असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करत कल्याण जीआरपीने गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. कल्याण जीआरपीने ट्रेनमध्ये छापेमारी करत गुटख्याच्या 24 गोण्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. अली मुस्ताक मरहुम, कृष्णा गुप्ता, खेमराज प्रजापती अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तिघांनी बिहार येथून मुंबईत हा गुटखा विक्रीसाठी आणला होता. आरोपींनी याआधी असा गुन्हा केला आहे का? आरोपी हा गुटखा कुठे तस्करी करणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
छपरा ते लोकमान्य टिळक टर्मिनस मेल एक्स्प्रेसमधील एसी बोगीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती कल्याण जीआरपीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मेल कल्याण रेल्वे स्थानकावर येताच कल्याण जीआरपीच्या पथकाने तपासणी केली.
या तपासणीत एसी बोगीत छापा मारला. यावेळी या बोगीत काही गोण्या संशयास्पद आढळून आल्या. कल्याण जीआरपीच्या पथकाने तात्काळ तपासणी केली असता गोण्यांमध्ये गुटखा असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या गोण्या जप्त करत या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी कृष्णा गुप्ता हा हमाल आहे तर उर्वरित दोन आरोपी हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.
या तस्करीमागे कोणाकोणाचा सहभाग आहे? हा गुटखा मुंबईत कोणाकडे पार्सल करण्यात येणार होता, याबाबत पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.