कल्याण / सुनील जाधव : कल्याणमध्ये दहशत पसरवणाऱ्या ए के गँगचा सदस्य शुभम गोसावी याच्या मुसक्या आवळण्यास अखेर कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे. कोळशेवाडी पोलिसांनी भिवंडी येथून सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. शुभम गोसावी हा कल्याणमधील ए के गँगचा सदस्य आहे. या गँगची कल्याण शहर विशेष करून कल्याण पूर्व परिसरात दहशत होती. या गँग विरोधात पोलिसांनी मोक्कांतर्गत कडक कारवाई केली. या टोळीचा मोरख्या अभिजीत कुडाळकर याच्यासह नऊ सदस्यांना कोळसेवाडी पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या होत्या. मात्र गँगचा सदस्य शुभम गोसावी हा पसार झाला होता.
वर्षभरापासून शुभम गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. तो कल्याण, तर कधी कोल्हापूर, पुणे अशी आपली ठिकाणे वारंवार बदलत होता. अखेर कोळसेवाडी पोलिसांना शुभम गोसावी हा भिवंडीत लपून बसल्याची माहिती मिळाली. कोळशेवाडी पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास भिवंडीतून सापळा लावून शुभम गोसावी याला अटक केली.
आरोपी शुभम गोसावीवर कल्याण झोन 3 अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात गंभीर मारहाण, हत्येचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते. अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी होता. गेल्या वर्षभरापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर कोळसेवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला जेरबंद केले.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे, सहायक पोलीस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार हनुमंत शिर्के, प्रमोद जाधव, सचिन कदम, मिलिंद बोरसे यांच्या पथकाने कामगिरी करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.