Kalyan Girl Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या केल्यानंतर विशाल गवळीने मोबाईल थेट… कोर्टात काय झालं उघड ?

| Updated on: Jan 04, 2025 | 11:58 AM

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करून मृतदेह कब्रस्तानात फेकून दिला आणि आरोपी विशाल गवळी मुंबईतून पळाला. शेगाव येथून त्याला अटक करण्यात आली, मात्र त्यापूर्वी त्याने त्याचा मोबाईल विकून टाकल्याचे समोर आले. मात्र ज्या बॅगेत त्या मुलीचा मृतदेह होता, ती मात्र...

Kalyan Girl Murder : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या केल्यानंतर विशाल गवळीने मोबाईल थेट... कोर्टात काय झालं उघड ?
Follow us on

कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचर करून तिचा खून केला. त्यानंतर पत्नी आणि एका मित्राच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह कब्रस्तानात फेकून देणारा नराधम आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगावमधन अटक केली होती. तसेच त्याची पत्नी साक्षी हिलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विशाल आणि साक्षी यांची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाचा हा निर्णय ऐकताच नराधम आरोपी विशालला न्यायालयाच्या आवारातच रडू कोसळले. आपल्या पत्नीला, साक्षीला एकदा तरी भेटू द्या अशी विनंतीही त्याने पोलिसांकडे केल्याचे समजते.

हत्येनंतर झाला फरार, मोबाईल विकूनच टाकला

दरम्यान आज विशाल आणि साक्षी या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे पोलिसांनी यावेळी नमूद केले. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, तेव्हा त्याच्या पत्नीने, साक्षीनेच विशाल याला घरात थांबू नकोस,माझ्या माहेरी पळू जा असा सल्ला दिला होता. त्यानुसार, विशाल गवळी हा पहिले ठाणे मग दादर येथे गेला आणि तेथून एक्स्प्रेस पकडून त्याने थेट बुलढाणा गाठलं. पोलिसांना आपला माग काढता येऊ नये म्हणून आरोपीने अतिशय हुशारीने त्याचा फोन बुलढाणा येथील लॉज मॅनेजरला अवघ्या 5 हजार रुपयांत विकून टाकल्याचे समोर आले, असे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितलं.

मात्र त्या मुलीचा मृतदेह ज्या बॅगमध्ये भरून बापगाव परिसरात टाकून दिला, ती बॅग अद्यापही सापडलेली नाही, असेही पोलिसांनी कोर्टासमोर नमूद केलं.

आरोपीने बॅग फेकून दिली, मोबाईल विकला आणि नवीन मोबाईल घेतला. त्याच्या जुन्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ आहेत का ? त्यावेळी कोणाला फोन केला होता का ? या गोष्टींचा अजून तपास करायचा असल्याचे सांगत आरोपीची आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत सर्व काही निष्पन्न झाल्याचं सांगत आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. अखेर न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.