सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 17 ऑक्टोबर 2023 : कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कपड्याच्या दुकानात शटरचे लॉक तोडून लाखोंचे कपडे लुटून चोरट्यांनी पोबारा केला. महत्वाचे म्हणजे भररस्त्याला लागून असलेल्या या दुकानात चोरी करताना तब्बल अर्धा तास शटर उघडं ठेवून ही चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांची गस्त असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी डाव साधल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याचेही त्यात दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे चोरट्यांनी लाखोंचा माल पळवल्यानंतर पीडित दुकानदार पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांनी तेवढी संपूर्ण रक्कम न लिहीता कमी किंमत लिहीण्यासाठी दुकानदारावर दबाव टाकत अवघ्या 66 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पहाटे शेजारच्या दुकानदाराचा फोन येताच घेतली धाव….
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या सनी नरेशसिंग भदोरीया याचे शिवांग फॅशन नावाचे रेडीमेड कपडयांचे दुकान आहे. शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सनी व त्याचा भाऊ रात्रीच्या १० च्या सुमारास दुकान बंद करून घरी गेला. मात्र पहाटेच्या सुमारास त्याला त्याच्या शेजारच्या दुकानदाराचा फोन आला. तुमच्या दुकानाचे शटर पूर्णपणे उघड असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकताच सनी आणि त्याच्या भावाने तातडीने धाव घेतली.
दुकानाच्या बाहेरच्या लोखंडी शटरला लावलेली दोन्ही कुलूपं तोडून शटर उचकटलेले होते.दुकानात शिरल्यावर आतमध्ये सर्व कपडे, माल अस्ताव्यस्त पडलेला त्यांना आढळला. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच सनी याने पोलिसांना कळवले, या घटनेची माहिती मिळतच कल्याण बाजार पेठ स्थानकातील पोलीस अधिकारी
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता, मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेले दोन जण शटर फोडून दुकानात घुसल्याचे त्यात दिसले. दोन्ही आरोपींनी सोबत आणलेल्या गोणीत, दुकानातील कपडे, जीन्स वगैरे माल भरला आणि ते तिथून फरार झाले.
कमी किमतीची नोंद करण्यास दुकानदारावर दबाव
पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दुकानातून सुमारे तीन लाखांचा माल चोरी झाल्याचे दुकानमालक सनीने पोलिसांना सांगितले. मात्र इतक्या किमतीची तक्रार दाखल करता येणार नाही, सर्व मालाची रिकव्हरी शक्य नाही असे सांगत पोलिसांनी दुकानदारावर दबाव आणण्यास सुरूवात केली. ते फक्त २० हजारांचा माल गेल्याचे नमूद करत होते. मात्र चोरीचा माल कितीतरी अधिक असल्याने दुकानमालक व इतर व्यापारी संतापले. या विरोधात अधिकाऱ्यांकडे जाण्याचा इशारा त्यांनी दिला. अखेर पोलिसांनी 66 हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांच्या या भूमिकेमुळे दुकानदारांमध्ये नाराजीचे सूर आहे. तसेच पोलिसांची गस्त असतानाही चोरीच्या घटना वाढत आहेत, यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही केली जात आहे.