कल्याण / 17 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरील हल्ला प्रकरण ताजे असतानाच आता नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. ड्युटीवर गेलेली महिला पोलीस तीन दिवसापासून बेपत्ता असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. बाजारपेठ पोलिसांकडून तीन पथक तयार करत महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. तीन दिवस उलटून शोध लागत नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. श्वेता सरगिरे असे 24 वर्षीय बेपत्ता महिलेचे नाव आहे. सदर महिला पोलीस नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होती. महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता सरगिरे ही महिला नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे महिला आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत मिसिंगची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत शोध सुरु केला.
बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. मात्र तीन दिवस उलटले तरी अद्याप महिलेचा थांगपत्ता लागला नाही. पोलीस तपासात महिला गेल्या काही दिवसापासून कामावर गैरहजर राहत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे महिलेच्या गायब होण्याबाबत गूढ वाढले आहे. दरम्यान, पोलिसांना महिलेला शोधण्यास अद्याप यश आले नसल्याने कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.