कल्याण : धावत्या मेल-एक्सप्रेसमध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. अपहरणकर्त्याला बोगीतील सतर्क प्रवाशांनी चोपून कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. साईनगर-शिर्डी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. सलीम पठाण असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. सध्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी सृष्टी गुप्ता या दीड वर्षाच्या चिमुरडीला माता-पित्याच्या स्वाधीन केले.
मुंबईच्या नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर-शिर्डी एक्सप्रेसने प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना सृष्टी आईच्या कुशीत झोपली होती. तर वडील लघुशंकेसाठी गेले होते. याच दरम्यान सृष्टीला एका इसमाने स्वत:जवळ घेतले. त्यानंतर हा इसम सृष्टीला उचलून घेऊन जाऊ लागला. हे पाहून बोगीतील काही सर्तक प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली.
प्रवाशांनी त्याला हटकत विचारपूस केली. मात्र हा इसम कोणतीही समाधानकारक उत्तरे देत नव्हता. याच दरम्यान बोगीत झालेला गलबला ऐकून झोपलेल्या सृष्टीच्या आईला जाग आली. तिनेही आपली मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे प्रवाशांनी तात्काळ त्या इसमाला पकडून चोप दिला. एक्स्प्रेस कल्याण स्थानकात येताच प्रवाशांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.