सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 19 जानेवारी 2024 : कल्याण भाजी मार्केट परिसरात व्यापाऱ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांचे इतर तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. बाजारपेठ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी या दरोडेखोरांकडून डोळ्यात मारायचा मिरची स्प्रे ,धारदार शस्त्र , रोख रक्कम, दरोड्याचे इतर साहित्य आणि दरोड्या साठी आणलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.
असे पकडले दरोडेखोर
कल्याणमधील एपीएमसी मार्केट जवळील धान्य बाजार परिसरात एका व्यापाऱ्याला काही दरोडेखोर शस्त्राचा धाक दाखवून लुटणार असल्याची खबर बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. तेव्हाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुखवते,पोलीस हवलदार सचिन साळवी,घुगे,आंधळे,फड,पावशे,भालेराव यांच्या पथकाने सापळा रचला. आणि रचून अजीम काझी अराफत शेख, अन्वर शहा, अरबाज इस्माईल शेख या चार सराईत आरोपींना धारधार शस्त्रासह अटक केली आहे.
एवढेच नव्हे तर दोन लोखंडी सुरे, एक लोखंडी चाकू,मोबाईल फोन, डोळ्यात मारायचा मिरची स्प्रे, रोख रक्कम आणि प्राणघातक हत्यारे तसेच एक रिक्षाही बाजारपेठ पोलिसांनी दरोडेखोरांकडून हस्तगत केली. पण पोलिस तेथे आल्याची माहिती दरोडेखोरांपैकी काही जणांना कळली आणि त्यांच्या तीन साथीदारांनी घटनास्थळावरून तातडीने पळ काढला. बाजारपेठ पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात जनावर चोरी, दरोडे, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी कल्याण मुंबई परिसरात अजून किती गुन्हे केले आहे याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत .