सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 13 नोव्हेंबर 2023 : कल्याण शहरातील गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. पोलिसांची वाढती गस्त असली तरी गुन्हेगारांच्या कारवाया सुरूच असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मात्र कठीण झालं आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिम येथे एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील चेन आणि पैसे घेऊन दोन आरोपी फरार झाले होते. त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली.
अखेर त्या सराईत गुन्हेगारांच्या दुकलीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. चांद शेख व निहाल शेख असे या दोघांची नावे असून ठाणे ,भिवंडी, कल्याणसह इतर ठिकाणच्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना अटक केली.
नशेसाठी लोकांना मारहाण करून लुटायचे
काही दिवसांपूर्वीच कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक ते पत्री पूल दरम्यान असलेल्या चार्ली हॉटेल जवळ एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. चोरट्यांनी त्याला चोप देऊन त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन पर्स व पैसे लुटले आणि ते फरार झाले. यासंदर्भात तक्रार बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अजिंक्य मोरे तसेच डीपीचे पथक पोलीस हवालदार गिरीष पवार, इंगळे ,कसबे ,शिर्के ,सुरेश पाटील यांच्या पथकाने याचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर
कल्याण apmc मार्केट परिसरात सापळा रचत पोलिसांनी चांद शेख व निहाल शेख नावाच्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी सराईत चोरटे असून यांनी ठाणे भिवंडी व कल्याण मधील अनेक परिसरात अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत. नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ते दोघे हे गुन्हे करायचे, अशी माहितीदेखील समोर आली आहे. सध्या पोलिसांनी या दोघांचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून दोन मोटरसायकली व चोरीला गेलेल्या सोन्याच्या वस्तू व पैसे असा बराच मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या दोन्ही गुन्हेगारांनी अन्य किती ठिकाणी चोरी केली आहे, याचा पोलिसांकडू तपास सुरू आहे.