कल्याण : महिलेने आपला मोबाईल नंबर ब्लॉक केला म्हणून एका तरुणाने रेल्वे स्थानकात राडा केल्याची घटना विठ्ठलवाडीमध्ये घडली. तरुणाने महिलेच्या पतीलाही मारहाण केली. यानंतर महिलेचा पती आणि तरुण दोघांमध्ये रेल्वे स्थानकातच जुंपली. यानंतर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करुन मारामारी सोडवली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. रोहित गायकवाड असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश ढगे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरमध्ये राहणारी एक महिला तिच्या पतीसोबत काल संध्याकाळी साडे चार वाजता डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पाोहचली. इतक्यात स्टेशनवर गाडीच्या प्रतिक्षेत बसले असताना पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला. याचवेळी त्या महिलेच्या ओळखीत असलेला रोहित गायकवाड नावाचा तरुण महिलेच्या जवळ आला. ‘त्याने तू मला ब्लॉक का केलं?’, अशी महिलेला विचारणा करत स्टेशनवर गोंधळ घालण्यास सुरवात केली.
याचदरम्यान महिलेचा पती तेथे आला. पतीने तरुणाला जाब विचारला. यामुळे संतापलेल्या रोहितने महिलेच्या पतीला मारहाण सुरू केली. यानंतर महिलेचा पती आणि रोहित यांच्यामध्ये हाणामारी झाली. स्टेशनवरील उपस्थित प्रवाशांनी मध्यस्थी करून हाणामारी सोडवली. यानंतर महिलेने या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी कलम 354, 354 ड आणि 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर कल्याण जीआरपी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.