कल्याण | 25 ऑक्टोबर 2023 : सध्या सर्वत्र सणासुदीचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता रहावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मात्र असे असतानाही कल्याण शहरात (kalyan news) एक धक्कादायक घडली आहे. कार पार्किंगच्या वादातून भडकलेल्या तरूणाने भररस्त्यात गाडीची तोडफोड केली. एवढंच नव्हे तर तो रस्त्यात दिसलेल्या लोकांनाही मारत सुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कॅप्चर झाला आहे. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते आरोपी तरूणाचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात गोंधळ माजला असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
कसा सुरू झाला वाद ?
झालं असं की कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील शास्त्री नगर परिसरात राहणारा पीडित इसम कन्हैय्या हा आपलं काम संपवून घरी परत चालला होता. त्यापूर्वी तो कार पार्क करण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी तिकडे ऋषी यादव नावाचा एका तरूण तेथे एका रिक्षा चालकासोबत वाद घालताना दिसाल. मात्र कन्हैय्या याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो काही त्यांच्या वादत पडला नाही. तेथे कार पार्क करून बाहेर पडत होता.
मात्र रिक्षा चालकाशी झालेल्या वादामुळे आरोपी ऋषी हा संतापला होता. त्याच रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉड घेऊन कन्हैय्यावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारून जखमी केले. एवढेच नव्हे तर त्याने कन्हैय्याच्या कारचीही तोडफोड केली. तो एवढा संतापला होता की त्याला रोखण्यास आलेल्या सर्वच नागरिकांवर त्याने हल्ला करत मारहाण सुरू केली. यामध्ये कन्हैय्यासह आणखीही एक जण जखमी झाला.
अखेर काही महिलांनी या माथेफिरू इसमाला रोखत कसेबसे शांत केले. त्यानंतर जखमी कारचालक कन्हैय्या याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मारहाण आणि कारच्या तोडफोडीची ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी माथेफिरू आरोपी ऋषी यादव आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र भरदिवसा, भर रस्त्यात अशाप्रकारे मारहाण करण्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातवरण असून नागरिकही दहशतीखाली जगत आहेत.