सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 18 नोव्हेंबर 2023 : चालत्या पुष्पक एक्स्प्रेसमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही एक्प्रेस इगतपुरीवरून कल्याणच्या दिशेने येताना हा प्रकार घडला. टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक सिग्नल लागल्याची संधी साधून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले. मुलीच्या मित्रांनीच हे अपहरण केल्याचा संशय त्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
नातेवाईकांकडून घरी येण्यास निघाली पण परतलीच नाही..
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ( वय 15) अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई-वडिलांसह डोंबिवली पूर्व येथे राहते. काही दिवसांपूर्वी ती इगतपुरीला तिच्या नातेवाईकांकडे राहण्यास गेली होती. 12 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीने तिच्या घरच्यांना मोबाईलवर फोन केला आणि मी इगतपुरी येथून पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणला उतरून डोंबिवलीला घरी येईन असे तिने सांगितले आणि प्रवास सुरू केला.
मात्र पुष्पक एक्प्रेस कल्याण स्थानकात पोहोचून पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेली. बराच वेळ उलटून गेला, रात्रीचे 11 वाजले तरीही ती मुलगी काही घरी आली नाही. तिच्या आई-बाबांनी तिला मोबाईलवर कॉल करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो स्विच्ड ऑफ येत होता. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिच्या एका मैत्रिणीकडे चौकशी केली. तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. ती मुलगी टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली उतरली आणि तिच्या एका मित्रासोबत निघून गेली, असे तिने सांगितले.
मुलगी मित्रांसोबत फिरायला गेली असेल, लवकरच ती घरी येईल या आशेवर तिच्या घरचे होते. पण चार दिवस उलटून गेल्यावरही ती घरी परत आली नसल्याचे सगळेच काळजीत पडले. त्यानंतर तिच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून मुलीचा मित्र प्रशांत याच्या विरोधात अपहरण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपहरण (३६३ कलम) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.