कल्याण : कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढल्या आहेत. सोमवारी दिवसभरत कल्याण आणि शहाड रेल्वे स्थानकावर एकूण 11 मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले अन् कल्याण लोहमार्ग पोलिसांनी विविध पथक बनवत गेल्या 24 तासात सात आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 10 मोबाईल आणि 2 पाकिटं हस्तगत केले आहे. कल्याण शहाड उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करायचे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपींकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण, शहाड, उल्हासनगर रेल्वे चालक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी दिवसभरात कल्याण रेल्वे स्थानकातून 10 प्रवाशांचे मोबाईल तर शहाड येथून एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ॲक्शन मोडवर आले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांचे एक पथक नेमण्यात आलं.
दिवसभरातील रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासत, खबऱ्यांकडून माहिती घेत अवघ्या 24 तासात तब्बल सात आरोपींना बेड्या ठोकत, त्यांच्याकडून 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. अहमद शेख, विशाल काकडे, मोहम्मद हसन अन्सारी, सरजील अन्सारी, सचिन गवळी, मंगल अली शेख, संदीप भाटकर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे सातही आरोपी सराईत चोरटे असून, त्यांच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.