सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 6 नोव्हेंबर 2023 : कधी स्वीमिंग टँकमध्ये मगरीचं पिल्लू आढळतं तर कधी स्टेशनजवळ अजगर आढळतो. ॲक्वा मरीन प्राणीसंग्रहालयातून ५-६ एक्झॉटिक प्राणी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना तर अतिशय ताजी आहे. मुंबईत रोज अशी वेगवेगळ्या, चित्र-विचित्र घटना कानावर पडत आहेत. त्यातच आत कल्याणमधूनही एक आगळी घटना समोर आली आहे. मात्र त्यामुळे नागरिकांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांची थोड्या वेळासाठी तारांबळ उडाली होती. असं नेमकं काय झालं, वाचूया…
कल्याणमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या एका स्पोर्ट्स बाईकमध्ये अचानक नाग दिसल्याने सर्वांना धक्का बसला. यामुळे पोलीस ठाण्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ माजला. या घटनेची माहिती सर्पमित्रांना देऊन त्यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्राने अवघ्या काही तासात नागाला रेस्क्यू करत वन अधिकाऱ्याच्या आदेशानंतर निसर्गा मुक्त केले.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात कावासाकी निंजा ही स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली होती. मात्र त्या बाईकमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अचानक साप दिसला. त्यानंतर हा नेमका कोणता साप आहे ते पाहण्यासाठी पोलिसांची मोठ्या प्रमाणात त्या गाडीच्या आजूबाजूला गर्दी झाली. पण त्या नागाने अचानक फणा काढल्याने तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तर काहींनी त्या ठिकाणी नागाला पिण्यासाठी चक्क दुधाची वाटी देखील ठेवली.
मात्र इतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती सर्पमित्रा संघटनेला दिली. नाग सापडल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करत या नागाला पकडण्यात यश आल्यानंतर वन विभाग अधिकाऱ्याच्या आदेशानंतर या नागाला निसर्गा मुक्त करण्यात आले.