सुनील जाधव, कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना आज उघडकीस आली आहे. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोराने खेचला आणि पळ काढला. मात्र प्रवाशाने या चोराचा पाठलाग केला. पळताना प्रवाशाला इजाही झाली आणि दुसऱ्या वेळी त्याला चोराने मारले. पण प्रवाशाने त्याचा पाठलाग सोडला नाही. अखेर प्रवाशाच्या जिद्दीमुळे हा भामटा पोलिसांच्या हाती लागलाच. आता त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. महेंद्र मारुती धुळधुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
अनिरुद्ध उमाशंकर शर्मा हे मूळचे उत्तरप्रदेश येथे राहणारे असून, मुंबईला ते चहाचा व्यवसाय करतात. उत्तर प्रदेशहून शर्मा हे पटना एक्प्रेसने मुंबईला परतत होते. यावेळी जनरल डब्यातून प्रवास करत असताना ते मोबाईलवर बोलत होते. यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांचा मोबाईल खेचला आणि तिथून पळ काढला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना शर्मा यांच्या दाढेलाही लोखंडी रॉड लागला. कल्याण रेल्वे स्थानकावर गाडी फलाटावर लागत असताना हा प्रकार घडला.
ही गाडी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 05 वर थांबल्यावर तो गाडीतून आऊटरला उडी मारून पळून जात होता. यावेळी शर्मा यांनीही त्याच्या पाठीमागे उडी मारुन चोर चोर असा आरडाओरडा करायला सुरुवात केली. शर्मा यांनी त्या चोराला पकडले, त्यानंतर त्याने पुन्हा शर्मा यांना मला मारहाण केली. पुन्हा शर्मा यांनी आरडाओरडा केला. या ठिकाणी ड्युटीवरील आरपीएफ आले आणि त्यांनी मोबाईल फोन जबरीने चोरणाऱ्या इसमास पकडले.
याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र मारुती धुळधुळे याला अटक केली आहे. तो ठाणे घोडबंदर येथे राहणारा असून, त्याचे मूळ गाव यवतमाळ आहे. त्याच्या खिशात चोराला पांढऱ्या रंगाचा OPPO कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला आहे.