कल्याण / सुनील जाधव : कल्याणमध्ये पुन्हा तोडफोडीचे सत्र सुरु झाले असून, यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री फिरणाऱ्या टोळक्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. हे टोळके दारुच्या नशेत मध्यरात्री परिसरात उच्छाद मांडतात. रस्त्यावर उभ्या असेलल्या गाड्यांची तोडफोड करुन नुकसान करतात. अशीच एक घटना काल मध्यरात्री पुन्हा घडली. कोळसेवाडी परिसरात काल मध्यरात्री भर रस्त्यात शिवीगाळ करत मद्यपी टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोळशेवाडी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी परिसरात मद्यपी तरुणांनी भर रस्त्यात शिविगाळ करत 5 ते 6 गाड्यांची तोडफोड केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपींनी महागड्या चारचाकी गाड्या, रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली आहे. यामुळे गाडी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गाड्यांची तोडफोड का करण्यात आली याचे कारण समजू शकले नाही. मात्र स्त्यामध्ये दारु पिऊन धिंगाणा करणे, लोकांना त्रास देण्याचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र रात्रीच्या वेळी पोलिसांनी ग्रस्त घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
याआधीही काही दिवसापूर्वी कल्याण-डोंबिवली परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. चारचाकी गाड्या, बाईकचे नुकसान करण्यात आले होते. सतत घडणाऱ्या या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपली वाहने सुरक्षित कशी ठेवायची हा मोठा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. अशा गु्न्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.