कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : बदलापूर रेल्वे स्थानकात गाढ झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याचा हा पराक्रम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्हीच्या मदतीने फरार चोरट्याला पकडण्यास कल्याण गुन्हे लोहमार्ग पोलिसांनी यश आले आहे. अनिल मासवकर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून, तो सराईत चोरटा आहे. स्टेशन परिसरात प्रवाशी गाढ झोपत असल्याची संधी साधत मौल्यवान वस्तू लंपास करायचा.
बदलापूर रेल्वे स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर 10 फेब्रवारी रोजी रात्रीच्या सुमारास थकवा आल्याने एका प्रवाशाला गाढ झोप लागली होती. ही संधी साधत या चोरट्याने त्याच्याजवळील मोबाईल रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा देखील करत होती. या चोरट्याचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही तपासले. यात पोलिसांनी या चोरट्याची ओळख पटवून त्याला डोंबिवली येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.
परभणीच्या पेडगाव येथे थांबलेल्या साईनगर-काकीनाडा एक्सप्रेसमधून चोरट्यांनी महिलांच्या पर्सेस आणि सोन्याच्या चेन घेऊन पळून जाण्याची घटना उघडकीस आली आहे. एस 2 आणि एस 11 या दोन डब्यातून चोरट्यांनी झोपलेल्या महिलांचे पर्सेस आणि दागिने घेऊन पोबारा केला. घटनेचा कुठलाही गुन्हा दाखल रेल्वे पोलिसात दाखल करण्यात आलेला नाही. मात्र रेल्वे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.