सध्या मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांची गस्त, कठोर तपास, नीट लक्ष ठेवूनही गुन्ह्याच्या अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावा लागत आहे. मध्य रेल्वे ही खरंतर मुंबईकरांची लाईउफलाइन, लाखो प्रवाशांची यातून रोज ये-जा असते. पण हा प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नाही. वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांची पाकिटं, मोबाईल पळवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रवाशांना लुटणाऱ्या, त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या अशाच एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून एक धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. चोरट्यांची ही टोळी चक्क तामिळनाडू येथील असून फक्त चोरीसाठी ते मुंबईत यायचे आणि नंतर पसार व्हायचे, हे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांकडून 11 महागडे मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.
असा झाला गुन्हा उघड
एका प्रवासाच्या मोबाईल चोरी प्रकरणात काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते. डोंबिवली जीआरपी पोलीस सत्यराजची चौकशी करून त्याच्याकडून माहिती काढून घेत होते. तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराजचे आणखी काही साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत.
सापळा रचला आणि…
ही माहिती मिळताच रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांचं पथक कामाला लागलं आणि त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर सापळा रचला. रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी, चोरी करण्यासाठी आलेले कृष्णा गणेश , शक्तीवेल अवालुडन ,गणेश सेल्वम यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. तपासणीत त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली आणि प्रवाशांचे लुटलेले 11 महागडे मोबाईल व एक लॅपटॉपही पोलिसांनी हस्तगत केला.
तामिळनाडूतून फक्त चोरीसाठी आले
त्याच्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे चोरट्यांची ही टोळी थेट तामिळनाडू राज्यातील होती. हे चोरटे वेल्लूर जिल्हा येथील उदय राजा पालयन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आले होती . ही टोळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यातही जायची आणि तेथील प्रवाशांना लक्ष्य करायची. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटायची. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. प्रवाशांची चोरीस गेलेले आणखी अनेक महागडे मोबाईल, लॅपटॉप वा इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक अरशद शेख पोलीस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला.