जयपूर | 9 डिसेंबर 2023 : पद्मावत चित्रपटाच्या निषेधार्थ निर्माता संजय लीला भन्साळी यांना थप्पड मारणारे राजपूत नेते आणि करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची त्यांच्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. करणी सेना अध्यक्षांच्या हत्येचे पोलिसांना धागेदोरे सापडायला सुरवात झाली आहे. खुद्द बिष्णोई टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. मात्र, या सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येचे दुबई कनेक्शन समोर आले आहे. दुबईत राहणारी एक कातील हसीना या हत्येमागे असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत.
5 डिसेंबर रोजी जयपूर येथे करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या झाली. धडाधड गोळ्या सुटल्या आणि सुखदेव सिंह गोगामेडी हल्लेखोरांचे लक्ष्य झाले. देशाची संस्कृती वाचवण्याचा नारा देणाऱ्या गोगामेडी यांच्या हत्येची बातमी काही क्षणातच सर्वदुर पसरली. राजपूत समाजाचे लोक गोगामेडी यांना आपला मोठा नेता मानत होते. त्यामुळे या बातमीने समाजावर एकच शोककळा पसरली.
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. पोलीस तपास सुरु झाला तेव्हा या हत्येसंबधी अनेकांची नावे जोडली गेली. त्यात पहिलं नाव समोर आलं ते बिश्नोई टोळीचं. या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीचा म्होरक्या रोहित गोदारा याचा एक मेसेज व्हायरल झाला. ज्यात त्याने या हत्येची कबुली दिली. गोगामेडी यांचे शत्रू असे वर्णन त्या मेसेजमध्ये करण्यात आले होते.
बिष्णोई टोळीचा म्होरक्या रोहित गोदारा याने हत्येची कबुली दिली तरी पोलीस तपास सुरु होता. मारेकऱ्यांना शोधण्याचे प्रमुख आव्हान पोलिसांसमोर होते. त्यांचा शोध सुरू असतानाच पोलिसांच्या हाती एक महत्वाची माहिती लागली. ती म्हणजे, या हत्येचे दुबई कनेक्शन. सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येमागे एका मुलीचे कनेक्शन समोर आले आहे. चिन्नू असे या मुलीचे नाव आहे.
पद्मावत चित्रपटानंतर गोगामेडी यांचे नाव खूप गाजले. चित्रपटाला विरोध करण्यासाठी त्यांनी संजय लीला भन्साळी यांना चित्रपटाच्या सेटवर जाऊन थप्पड मारली. त्यामुळे राजपूत समाजात ते खूप प्रसिद्ध झाले होते. 2021 मध्ये ते करणी सेनेचे अध्यक्ष झाले. त्यामुळे त्यांचा मान आणखी वाढला.
जसजसा दर्जा वाढू लागला तशी त्यांच्या शत्रूंची संख्याही वाढू लागली. गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 200 हून अधिक जणांची चौकशी केली. जयपूर, दिडवाना, बिकानेर, चुरू येथे प्रकरणाशी संबंधित संशयितांची कसून चौकशी केली. या तपासात बिष्णोई टोळीचा हात असल्याचे स्पष्ट झाले असले तरी या टोळीशी आणखी कुणाचा संबंध आहे या प्रश्नाचे उत्तर शोधताना पोलिसांना दुबई कनेक्शन सापडले.
चिन्नू उर्फ चरणजीत सिंग ही गँगस्टर आनंदपाल याची मुलगी आहे. आनंदपाल पोलीस चकमकीत मारला गेला. त्यानंतर त्याच्या मुलीने गुन्हेगारी दुनियेत उडी घेतली. सध्या ती दुबईत राहत आहे. आनंदपाल आणि गोगामेडी यांचे संबंध चांगले होते. पण आनंदपालच्या मृत्यूनंतर मुलगी चिन्नू हिचे आणि गोगामेडी यांचे संबंध बिघडले.
बिष्णोई टोळीचा म्होरक्या रोहित गोदारा याचे शार्प शूटर वीरेंद्र याच्यावर सर्वाधिक विश्वास आहे. हाच वीरेंद्र दुबईत राहणाऱ्या चिन्नू हिच्या सतत संपर्कात असतो. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई आता चिन्नूकडे वळली आहे. दुबईत राहणारी चिन्नू या हत्येत सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बिश्नोई टोळीचा गुंड रोहित गोदारा यांच्या मेसेजमुळे यासारख्या अनेक गोष्टी उघड होत आहेत.