कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये द केरला स्टोरी या सिनेमाची पुनरावृत्ती झाली आहे. केरला स्टोरी सिनेमात जसं घडलं तसंच इचलकरंजीत घडल्याने खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील चंदूर परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने सोशल मीडियावर ओळख करत एका हिंदू अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे हिजाब घालून फोटो काढले आणि पीडित मुलीस मुस्लीम धर्माप्रमाणे वागण्यास सांगत ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच साद मुजावर ( वय 21, रा. आभार फाटा, चंदूर ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
साद मुजावर हा शहरातील हा चिकनच्या दुकानात कामाला आहे. सहा महिन्यापूर्वी त्याची एका हिंदू अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्याने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांचे भेटणेही सुरू झाले. दोघे शहरातील कॉफी शॉपमध्ये नेहमी भेटायचे. यावेळी त्याने तिच्याशी मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या मुलीला त्याने हिजाब घालून फोटा काढण्यास सांगितलं. तिच्यासोबत फोटो काढले आणि तिला मुस्लीम रिवाजाप्रमाणे वागण्यास सांगितलं. तसे न केल्यास फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकीही दिली. तसेच तिचा विनयभंग केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन साद मुजावर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून साद विरोधात गुन्हा दाखल केला. अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, विनयभंग आदी विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे यांनी दिली आहे. या प्रकरणी सदर तरुणाची कसून चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याबाबतची माहिती मिळताच शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्आय ओळखून पोलिसांनी चंदूर (आभार फाटा) परिसरातील साद मुजावर याच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणाचा पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे अधिक तपास करत आहेत.