कल्याण : कुख्यात शार्प शूटर आणि दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या तीन आरोपींना कल्याण आंबिवलीत सहा महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद रामचंद्र पांडे असे या घरमालकाचे नाव असून, तो बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्यावर पोलिसांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवणे बंधनकारक असतानाही पोलिसांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवला आहे.
दोन दिवसांपूर्वी कल्याण आंबिवली परिसरातून पंजाब अॅन्टी गँगस्टर स्क्वॉडने महाराष्ट्र एटीएस टीमने तीन लोकांना ताब्यात घेतले होते. शिवम अवतार महालो, गुरमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा अमनदीप, कुमार गुरमेलचंद उर्फ रन्चो अशी अटक झालेल्या खत्री गँगचे शूटर्सची नावे आहेत.
या आरोपींना अटक केल्यानंतर आता खडकपाडा पोलिसांनी घर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. नियमानुसार घातक कारवायांना आळा घालण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
असे असतानाही प्रमोद पांडे या मोहने येथील बांधकाम व्यावसायिकाने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवत खडकपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पांडे हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्याने अशा प्रकारे पैशाच्या लालसेने किती भाडेकरूची माहिती लपवून ठेवत त्यांना आश्रय दिला याबाबतही पोलिसांकडून देखील सुरु आहे.
पंजाबमधील एका हत्या प्रकरणात हे आरोपी फरार होते. सहा महिन्यांपासून हे आरोपी आंबिवलीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. या आरोपींवर बरेच गुन्हे दाखल असून पंजाबमधील ड्रग प्रकरणातही हे आरोपी वॉन्टेड होते.