पलामू : झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या जावयाच्या हत्ये प्रकरणी सासरवाडीतले लोक तुरुंगात शिक्षा भोगत होते, तो जावई सहा वर्षांनंतर जिवंत सापडला आहे. राम मिलन चौधरी उर्फ चुनिया असे या जावयाचे नाव आहे. छतरपूर पोलिसांच्या मदतीने सातरबवा पोलिसांनी राममिलनला अटक केली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, सरिताचा राममिलनसोबत 2009 मध्ये विवाह झाला होता. लग्नात रिवाजाप्रमाणे हुंडाही देण्यात आला होता. मात्र सासरच्या लोकांना अजून पैसे हवे होते. यासाठी ते बहिणीचा छळ करत होते.
अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून बहिणीने पोलिसात छळवणूक प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 498 ए (पतीकडून छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
छळवणूक प्रकरणी गु्न्हा दाखल केल्यानंतर यातून बचाव करण्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. राममिलन चौधरी उर्फ चुनिया याचा भाऊ दिलीप चौधरी याने सासरवाडीतील आठ जणांवर भावाचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणी राममिलनची पत्नी सरिता, सासू कलावती, सासरे राधा चौधरी, मुलीची बहीण, काका यांच्यासह कुदरत अन्सारी, लालन मिस्त्री आणि दानिश अन्सारी यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले. सध्या दानिश अन्सारी तुरुंगात आहे.
तुरुंगात टाकल्याचा धक्का सहन न झाल्याने पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला. पीडितेचा भाऊ दिपक चौधरीच्या म्हणण्यानुसार त्याने पोलिसांना सांगितले की, राममिलन जिवंत असून तो त्याच्या घरी येत राहतो.
यानंतर छतरपूर पोलिसांनी राममिलन चौधरी उर्फ चुनिया याला भव पुलियाजवळून अटक करून सातबरवा पोलिसांच्या ताब्यात दिले. सातबरवा पोलिस ठाण्याचे प्रभारी हृषिकेश कुमार राय यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.