मुंबई : मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासांच्या आत तिला पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत मुलीचा शोध घेतला. विशेष म्हणजे मुलीला ज्या मित्राने पळवून नेले होते, तो आरोपी मुलीला मित्राच्या घरात सोडून बेपत्ता झाला होता. मुलीला पळवून आणल्याची कुठलीच खबर आपल्या मित्राला किंवा त्याच्या घरच्या लोकांना दिली नव्हती. मुलीच्या बाबतीत कुठलीही अनुचित घटना घडण्याआधीच पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीला कोणत्या हेतूने पळवून नेले? त्याने मुलीला कुठले आमिष दाखवून नेले का? हे अद्याप उघडकीस आलेले नाही. मात्र त्याने तिला कुठलीही कल्पना न देता मुंबईतील घरातून फूस लावून पळवून नेले आणि नालासोपाऱ्यातील मित्राच्या घरात सोडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. अल्पवयीन मुलीला मुंबईतून विरारच्या दिशेने नेण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली होती. या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना अल्पवयीन मुलीचा थांगपत्ता लावण्यात यश आले. मात्र आरोपी कुठे गेला याचा काही तास पत्ता लागत नव्हता.
पोलिसांनी एकाच वेळी नालासोपारा आणि मुंबईमध्ये तपासाची सूत्रे हलवली होती. अखेर अल्पवयीन मुलीला नालासोपाऱ्यात सोडून फरार झालेला आरोपी दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात सापडला. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली आहे. विपुल दत्तात्रय असे 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी 7 जून रोजी पालकांना न सांगता घरातून निघून गेली होती. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी पहाटे अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. यानंतर 24 तासात मुलीचा शोध घेतला.