कल्याण / 21 ऑगस्ट 2023 : हल्ली सोशल मीडियावरील ओळखीतून प्रेमसंबंध आणि गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियावर प्रेम करत अपहरण, हल्ले, हत्या अशा घटना उजेडात येत आहेत. अशीच धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवरील प्रियकराने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पथकाने 48 तासांच्या आत मुलीची सुटका करत प्रियकरला ताब्यात घेतले आहे. कुणाल रविंद्र रातांबे असे अटक करण्यात आले आहे. सोलापूर ते मुंबई गदक एक्सप्रेसने प्रवास करत असताना ही घटना घडली.
पीडित मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर सोलापूर ते कल्याण गदक एक्सप्रेसने मुलगी प्रवास करत असतानाच तरुणाने अल्पवयीन प्रेयसीला फूस लावून स्वतःसोबत नेत अपहरण केले. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार 19 ऑगस्ट रोजी दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला.
पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात उतरताना दिसली. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. सदर मुलगी कर्जत येथील मोठे वेणगाव येथे आढळून आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. तर आरोपी तरुणाला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हस्तांतरीत केले आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उप-आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश चिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अरशुद्दीन शेख यांनी पोलीस उप निरीक्षक अशोक होळकर, गजानन शेडगे, अमित बडेकर, अनिल खाडे, राजेश कोळसे, शशिकांत कुंभार, इम्रान शेख, सोनाली पाटीलसह इतर पोलीस कर्मचारी आणि हवालदारांनी ही कामगिरी केली.