कोल्हापूर | 27 डिसेंबर 2023 : काल ( मंगळवार, 26 डिसेंबर) सर्वत्र उत्साहात आणि भक्तीभावाने दत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. दत्त नामाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते. मात्र त्याचवेळी कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. ‘आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आले आहेत’ असा दावा करत एका दांपत्याने त्यांच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवले. त्यामुळे एकच खळबळ माजली. गडचिरोकी येथील कसबा बावडा येथे घडलेल्या प्रकाराची शहरात सगळीकडेच चर्चा सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे असे संबंधित संशयित दांपत्याचे नाव असून शाहूपुरी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी त्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
बुवाबाजी करणाऱ्या दांपत्याची दखल, प्रशासनाकडून कारवाई
इंद्रायणी आणि हितेश वलादे या दोघांनीही कसबा बावडा येथे ‘श्री बाल स्वामी समर्थ’ नावाने मुलाची ओळख बनवली होती. अगदी कमी वेळातच त्यांचे हजारो भक्त झाले होते.त्यांनी दत्त जयंतीच्या निमित्तानेदेखील कसबा बावडा येथे भव्य पारायण करत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमालाही बरीच गर्दी झाली होती. मात्र या प्रकाराविरोधात अज्ञात व्यक्तीने तक्रार दाखल केली. अशा अंधश्रद्धा पसरवणे, दहशत पसरवणे किंवा बुवाबाजी करणे यासाठी लहान मुलांचा असा वापर करणे हा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काल संध्याकाळी वलादे दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला.