पश्चिम बंगाल : कोलकातामध्ये (Kolkata) प्रसुती झाल्यानंतर एक महिला अचानक रुग्णालयातून गायब झाली. काही वेळाने ती सापडलीदेखील. पण ज्या अवस्थेत ही महिला आढळली, त्याने एकच खळबळ उडाली. हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळला आला. कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजात या महिलेनं रविवारी एका मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून ती अचानक गायब होती. या महिलेचा शोध घेतला जात होता. पण तिचा मृतदेह (Kolkata Murder News) आढळून आल्यानंतर सगळेच हादरलेत.
लालबाजार पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतलाय. हा प्रकार हत्येचा असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
बुधवारी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी तिची प्रसुती झाली होती. पण अचानक ही महिला प्रसुतीनंतर गायब झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर या महिलेचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आलेला.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली होती. पण त्याचा काही फायदा झाला नाही. या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काहीच प्रयत्न केला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केलाय.
सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मतदेह रुग्णालयाच्या आवारातच आढळून आला. रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागाच्या मागच्या बाजूस या महिलेचा मृतदेह पडलेला होता. यावेळी महिलेचे हात पाठीमागच्या बाजूला बांधून ठेवण्यात आले होते, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय.
धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या शरीरावर प्राण्यांनी घाव केल्याचे निशाण आढळून आल्याचा आरोप करण्यात आलाय. कुत्र्या, मांजरांनी महिलेच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या महिलेची हत्या वॉर्डमध्येच करण्यात आली अससल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आलाय.
रविवारी वॉर्डमध्ये आणि शौचालयात का तपास केला गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दुपारी 12 वाजता पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जातो आहे. वॉर्डमध्ये हत्या करुन महिलेचं शव बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या हत्याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.