कल्याण / सुनील जाधव : पोलीस बनून कारवाईच्या बहाण्याने बाईक घेऊन पळणाऱ्या आरोपीला तीन तासाच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोळशेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला जेरबंद केले. दिलीप पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाला. पोलीस दुसऱ्या आरोपीचाही शोध घेत आहेत. आरोपी उल्हासनगर महापालिका हद्दीत ट्रॅफिक वार्डन म्हणून काम करत होता. त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याने त्याला कामावरून काढण्यात आले होते. मात्र ट्राफिक पोलिसांसोबत राहून तो स्वतःला ट्राफिक पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करायचा.
कोळसवाडी परिसरात एका मोटरसायकलस्वाराला लायसन्स नसल्याने 1100 रुपये दंड मागून त्याची गाडी घेऊन पसार झाला होता. मात्र गुन्हा दाखल होताच कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तीन तासाच्या आत या आरोपीला बेड्या ठोकत चोरी केलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.
कल्याण पूर्वेकडील मेट्रो मॉलजवळ राजाराम गुप्ता हे आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी दोन इसम दुचाकीवरून आले त्यांनी गुप्ता यांची दुचाकी अडवली. यापैकी एकाने आपण पोलीस असल्याचं सांगत लायसन्स दाखवण्यास सांगितलं. यावेळी गुप्ता यांनी आपल्याकडे लायसन्स नाही अशी माहिती दिली.
लायसन्स नसल्याने तुम्हाला 1100 रुपये दंड भरावा लागेल. तसेच पोलीस चौकीत यावं लागेल असं त्या दोन आरोपींनी सांगितलं. यापैकी एकाने गुप्ता यांना त्यांच्याच गाडीच्या मागे बसवलं. यावेळी फिर्यादीला बोलण्यात गुंतवण्यात आलं. चक्कीनाक्याजवळील वखारीच्या जवळ आरोपीने गाडी थांबवत गुप्ता यांना उतरायला लावले आणि गाडी घेऊन आरोपी पसार झाला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं गुप्ता यांच्या लक्षात आलं.
गुप्ता यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, एपीआय हरिदास बोचरे, एपीआय दिनकर पगारे यांच्या टीमने सीसीटीव्हीच्या मदतीने अडीच तासात एका आरोपीला अटक केली. आरोपीवर काही गुन्हे देखील दाखल आहे. एका गुन्ह्याच्या सुनावणीसाठी गावावरून तो कल्याण न्यायालयात आला होता.