नवी मुंबई : कोपरखैराणे परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अॅक्शन मोड येत वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती घरफोडी करणारं जोडपं लागलं. पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक महिला ही पोलीस कन्या आहे. दोघेही आरोपी सुशिक्षित आहेत. मात्र मौजमजेसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी हा चोरीचा मार्ग पत्करला. श्रेयस जाधव आणि वैशाली जाधव अशी अटक जोडप्यांची नावे आहेत. घरफोडी प्रकरणी कोपर खैरणे पोलिसांनी या दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
या जोडप्याची सोशल मीडियावर ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि गेल्या महिन्यात त्या दोघांनी लग्न केले. दोघांनाही मौजमजा करण्याची सवय आहे. यासाठी त्यांना सतत पैशाची चणचण भासायची. यामुळे ते गुन्हेगारी मार्गाला लागले होते. कोपरखैरणे परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु होता. चोऱ्या, घरफोडी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात वेगवेगळ्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत होता. त्यामुळे सीसीटीव्हीसह तांत्रिक तपासावर भर दिला जात होता. तेव्हा हा प्रकार समोर आलाय, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अजय भोसले यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
तांत्रिक तपासद्वारे या जोडप्याची माहिती हाती आली. या दोघांनी मिळून एक घरफोडी केली होती. त्यात दोन लाखाचा मुद्देमाल या दोघांनी लुटला होता. चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने असा हा ऐवज होता. या दोघांनी अजून असे किती गुन्हे केले आहेत? याचा देखील कोपरखैरणे पोलीस तपास करीत आहेत. आरोपी तरुण हा सेल्समॅनचं काम करत असल्याचं माहिती समोर येत आहे.