पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. पुण्यातील महम्मदवाडी परिसरात कोयता गँगची दहशत माजवल्याचे वृत्त आहे. यामुळे या ठिकाणी अतिशय भीतीचे वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. कोयता गँगमधील हल्लेखोरांनी महम्मदवाडी परिसरातील एका पानाच्या दुकानावर अचानक हल्ला चढवल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्या दुकानदाराला त्यांनी बेदम मारहाणही केली. एवढंच नव्हे तर दुकानाची तोडफोड करत दुकानातील साहित्यही या हल्लेखोरांनी उधळून लावलं.
सीसीटीव्ही मध्ये कैद झाला हल्ला
हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हल्लेखोरांचा हैदोसही त्यात टिपला गेला आहे. रात्रीच्या वेळेस तोंडावर मास्क लावलेले दोघे जण धावत त्या दुकानाजवळ आले आणि त्यांनी हातातील कोयत्याने दुकानावर हल्ला केला. तसेट त्या दुकानादारालाही मारहाण केली. त्याने विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला, त्याच्यावर कोयत्याने वार केला. त्याचवेळी आणखीही एक निळ्या शर्टातील हल्लेखोर तेथे आला आणि त्याने दुकानातील सर्व वस्तू इतस्तत: फेकण्यास सुरूवात केली आणि दुकानाचीही नासधूस केली. तेथील काचेच सामान, बाटल्याही फोडल्या , त्यानंतर कोयता घेऊन त्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
हा हल्ला नेमका कोणी आणि का केला, हे अद्याप समजून शकलेले नाही. पण सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात दहशतीचे, भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वीही पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली होती. शहरात अनेक ठिकाणी कोयता गँगच्या सदस्यांनी हैदोस माजवला होता.