टोरांटो : कॅनडातील (Canada) स्टोनी क्रीक, ओंटारियो, येथून एक अतिशय दुःखद आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. येथे एका घरमालकाने (Landlord) त्याच्या भाडेकरू जोडप्याला (Fatally Shot Tenants) गोळ्या घालून ठार केले. एबीसी न्यूजनुसार, भाडेकरूसोबत झालेल्या वादानंतर त्या व्यक्तीने तरुण जोडप्यावर गोळ्या झाडल्या. कॅरिसा मॅकडोनाल्ड (27) आणि ॲरॉन स्टोन (28) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. 57 वर्षीय आरोपी घरमालकाने हॅमिल्टन पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही घटना गेल्या शनिवारी सायंकाळची आहे. मृत जोडपे हे निष्पाप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आउटलेटनुसार, हॅमिल्टन डिटेक्टिव्ह सार्जंट स्टीव्ह बेरेझुक म्हणतात की जेव्हा त्या दोघांना गोळी लागली तेव्हा दोघे निवासस्थानातून पळून जात होते. ही अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ करणारी घटना आहे, असे सार्जंट म्हणाले.
आउटलेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने अलीकडेच 57 वर्षीय व्यक्तीच्या घराचे बेसमेंट भाड्याने घेतले होते. घरमालक तळघराच्या वरच्या मजल्यावर राहत होता. या तरुण जोडप्याचे नुकतेच लग्न झाले होते. मॅकडोनाल्ड शैक्षणिक सहाय्यक होती तर स्टोन इलेक्ट्रीशियन होते.
मात्र पोलिसांनी अद्याप या घटनेची अचूक आणि संपूर्ण माहिती दिलेली नाही. गोळीबाराचे कारण तपासले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. घराच्या दुरावस्थेवरून काही वाद झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले आहे.
या घरमालकाच्या नावावर अनेक शस्त्रे नोंदणीकृत आहेत. या घटनेनंतर घरमालकाचे नाव जाहीर करण्यात आले नाही. पोलिस आल्यावर त्याने स्वतःला बॅरिकेड करून घेतले होते. तो सशस्त्र होता. पोलिसांनी त्याच्याशी बोलून त्याला शांततेने आत्मसमर्पण करण्यास सांगितले. अनेक तास त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही त्याने आत्मसमर्पण न करता पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला आणि घटनास्थळी असलेल्या पोलिसांवरही गोळ्या झाडल्या. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देत त्याला जागीच ठार केले. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.