लातूर : लातूर जिल्ह्यामध्ये एका 35 वर्षीय तरुण डॉक्टरचा अपघातात (Latur Accident) दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. डॉक्टर निलेश हेडे (Doctor Nilesh Hede) दवाखाना बंद करुन दुचाकीवरुन गावाकडे जायला निघाले होते. मात्र वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला धडकली (Bike Accident) आणि डॉक्टर गंभीर जखमी झाले. जखमी डॉक्टरला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
लातुरातील औराद शहाजनी येथील डॉक्टर निलेश हेडे यांचा बाईक अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाची ट्रॉली अंधारात त्यांना दिसून आली नाही. या ट्रॉलीला डॉक्टर निलेश हेडे यांच्या भरधाव दुचाकीने मागून जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला.
या धडकेत निलेश हेडे (वय 35) हे गंभीररीत्या जखमी झाले आणि रस्त्यावरच कोसळले. अपघाताबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना झाले.
बीएएमएस असलेल्या डॉक्टर निलेश हेडे यांचा औराद शहाजनी इथं खासगी दवाखाना आहे. हॉस्पिटल बंद झाल्यानंतर बाईकवरुन ते आपल्या गावाकडे निघाले होते. त्यावेळी वाटेतच अनर्थ घडला. या अपघातामुळे हेडे कुटुंबीयांना मोठा धक्काच बसलाय.
लातूर जाहिराबाद मार्गावर हलगरा पाटी जवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. अंधारात ट्रॉलीचा अंदाज न आल्यानं डॉ. निलेश यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या बाईकचाही चक्काचूर झाला. तर जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता.
डॉक्टर निलेश हे दररोज हलगरा या त्यांच्या गावावरुन औराद शहाजनी इथं ये-जा करायचे. पण मंगळवारी गावी परतत असताना त्यांचा झालेला मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला. डॉ निलेश यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.