लातूर – “कॉपीड गर्ल” म्हणून वर्गात शिक्षकाने (Teacher) चिडवल्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ही घटना लातूर शहरात (latur city) घडल्यापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर मुलीच्या आईने या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस (latur shivajinagar police) स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
श्रावणी नाईकनवरे ही विद्यार्थीनी नववीच्या वर्गात शिकत होती. तिच्या शाळेचं नाव किड्स इन्फोपार्क असं आहे. त्या शाळेतील शिक्षक राहुल पवार यांनी कॉपीड गर्ल असं म्हणून वर्गात चिडवल्याने श्रावणीची मानसिकता खचली होती. त्याच मानसिकतेतून श्रावणीने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मागच्या चार दिवसात लातूर जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. मागच्या तीन दिवसापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिची प्रथम सत्राची परीक्षा दोन दिवसावर होती .तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.