नाशिक : महाराष्ट्रातील एटीएसने राज्यातील पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. त्यात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात यश आले असून इतरांचा शोध सुरू आहे. त्यात मुंबई, नाशिक व औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे. काही संशयितांना नाशिक जिल्हा रुग्णालय (Nashik Civil Hospital) आणि न्यायालयात (Court) हजर करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये मालेगाव येथून मौलाना सैफुर रहमान, बीड येथून वसीम शेख, पुणे येथून अब्दुल कैयूम शेख, राझिक अहमद खान आणि कोल्हापूर येथील नसीब मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.
वादग्रस्त ओळख असलेली मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर संशय होता आणि त्यापासून धोका असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या वादग्रस्त संघटनेचे देशभरात तीन लाख फॅमिली मेंटेनन्स नावाखाली कतार, कुवैत, बहरिन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना थोड्याच वेळात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पहाटेच्या वेळेला ही कारवाई करण्यात आल्याने पाच जणांना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. त्यातच अनेक संशयित पसार झाल्याने त्यांच्या मागावर देखील पथके रवाना केल्याची माहिती आहे.