नाशिक : सध्या टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मिडियाच्या ( Social Media ) माध्यमातून एक लिंक व्हायरल होत आहे. त्यामध्ये हॅकर्सने बनावट लिंक तयार केली आहे. त्यामध्ये ती बऱ्याच ठिकाणी शेअर होत असल्याने अनेकांची फसवणूक ( Fraud ) झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका देशपातळीवरील नामांकित बँकेची बनावट लिंक ( Fake Link ) तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या बँकेचे ग्राहक त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरल्यास काही क्षणातच बँकेतील संपूर्ण पैसे डेबिट होत आहे. त्यामुळे हॅकर्सने गंडा घालण्याचा नवा फंडा शोधला आहे.
ऑनलाईन व्यवहार सुरू असल्यामुळे वेळ वाचत असतो. व्यवहार देखील जलद होतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार ही बाब चांगली आहे. मात्र, त्याच्या आडून फसवणूक होण्याचे प्रमाण हळूहळू वाढतच चालले आहे.
ऑनलाईन व्यवहार करत असतांना बँकेच्या संकेतस्थळावर किंवा ॲपवरुन व्यवहार करण्याचा सल्ला बँकेचे अधिकारी किंवा सायबर तज्ज्ञ देत असतात. मात्र, हुबेहुब बँकेच्या सारखेच बनावट ॲप असल्याने अनेकांचा गोंधळ होण्याची शक्यता अधिक आहे.
नाशिकमधील सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत जनजागृती सुरू केली आहे. पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली आहे. व्यवहार करतांना काळजीपूर्वक व्यवहार करण्याचे आवाहन ते करत आहे.
ऑनलाईन व्यवहार करत असतांना बँकेने संकेतस्थळ असेल किंवा अॅपबाबत सुरक्षितता बाळगली असली तरी हॅकर्सने बँकेचीही डोकेदुखी वाढवली आहे. नवनवीन फंडे राबवून हॅकर्सने बँकेच्या ग्राहकांना फसविण्याचे काम सुरू केले आहे.
तुमच्या मोबाईलवर कुठल्याही माध्यमातून बनावट लिंक येते. तुम्हाला त्याबाबत माहिती भरण्याचे आवाहन केलेले असते. आणि तुम्हाला समोरील दृश्य पाहून हुबेहुबे बँकची लिंक वाटते. आणि तुम्ही माहिती भरताच तुमच्या खात्यातील सर्व पैसे गायब होतात.
नुकतीच समोर आलेली एक लिंक ही एचडीएफसी बँकेची बनावट लिंक आहे. ही लिंक ओरिजनल लिंकशी मिळतीजुळती आहे. आणि त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन हॅकर्स गंडा घालत आहे.
काही क्षणात अकाऊंट मधील पैसे गायब होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ऑनलाइन व्यवहार करतांना याबाबत खात्री करूनच व्यवहार करा नाहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सायबर तज्ज्ञ देखील याबाबत ऑनलाईन व्यवहार करतांना काळजीपूर्वक करण्याचा सल्ला देत आहे. याच दरम्यान कुठलीही लिंक ओपन करून माहिती भरू नका असे आवाहन करत आहे.