बाईकच्या बॉक्स डिक्कीतून नवजात बाळाचा मृतदेह नेण्याची दुर्दैवी वेळ वडिलांवर का आली?

| Updated on: Oct 20, 2022 | 9:25 AM

काळीज हेलावून टाकणारी घटना! बॅगमधून नवजात बाळाचा मृतदेह बाहेर काढताच संपूर्ण प्रशासन हादरलं

बाईकच्या बॉक्स डिक्कीतून नवजात बाळाचा मृतदेह नेण्याची दुर्दैवी वेळ वडिलांवर का आली?
नवजात बालिकेला मातेने कचऱ्यात फेकले
Image Credit source: Social Media
Follow us on

नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांवर दुर्दैवी वेळ ओढावली. एका नवजात बाळाचा मृतदेह (Dead body) वडिलांनी अक्षरशः बाईकच्या बॉक्स डिक्कीतून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) कार्यालयात नेला. आपल्याला रुग्णावाहिका नाकारल्यानं नवजात बाळाच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ही घटना मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) घडली. मंगळवारी घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत बाळाच्या वडिलांनी केलीय.

मूळच्या उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये राहणारे दिनेश भारती यांची पत्नी गरोदर होती. तिला प्रसुती कळा येऊ लागल्याने ते आपल्या पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचले. मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथील जिल्हा रुग्णालयात पत्नीसह ते आले. तिथे असलेल्या डॉक्टरांनी चाचण्या करण्यासाठी पत्नीला एका क्लिनिकमध्ये पाठवलं. तिथे त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले गेले.

चाचण्या करुन दिनेश पुन्हा जिल्हा रुग्णालयात पत्नीला घेऊन आले. तिथे पत्नीने मृत बाळाला जन्म दिला. या दुःखातून सावरण्याची मानसिक तयारी करायची होती. पत्नीला सांभाळायचं होतं. पण त्यात रुग्णालय प्रशासनाच्या अमानवी कृतीचा सामनाही दिनेश यांना करावा लागला.

हे सुद्धा वाचा

पत्नी आणि मृत बाळाला घेऊन जाण्यासाठी दिनेश यांनी रुग्णवाहिका मिळावी, अशी विनंती केली. पण रुग्णालय प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या दिनेश यांना काय करावं, हे सुचेनासं झालं होतं. ते प्रचंड संतापले.

संतापलेल्या दिनेश यांनी अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. आपल्या दुचाकीच्या बॉक्स डिक्कीतूनच ते नवजात बाळाचं शव घेऊन तिथे पोहोचले. बॅगमधून आणलेला नवजात बाळाचा मृतदेह ते जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर काढला. ते दृश्य पाहून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच हादरुन गेलं.

आता याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी दिनेश भारती यांनी केली आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीना यांनी याबाबत एक चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिलेत. तर दोषी असलेल्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिल्याचं म्हटलंय.