Mahadev App Case : महादेव ॲप केसमध्ये ईडीला मोठं यश, रवी उप्पलचे दुबईतून भारतात होणार प्रत्यार्पण

| Updated on: Jan 11, 2024 | 7:40 AM

महादेव बेटिंग ॲप केसमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. या ॲप केसप्रकरणातील प्रमोटर्सच्या अडचणी आणखी वाढू शकतात. कारण महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mahadev App Case : महादेव ॲप केसमध्ये ईडीला मोठं यश, रवी उप्पलचे दुबईतून भारतात होणार प्रत्यार्पण
Follow us on

मुंबई | 11 जानेवारी 2024 : महादेव बेटिंग ॲप केसमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. या ॲप केसप्रकरणातील प्रमोटर्सच्या अडचणी आणखी वाढू शकतात. कारण महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात रवी उप्पल याला दुबईत अटक करण्यात आली होती. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली. उप्पल याला प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्याची महत्त्वाची कायदेशीर औपचारिकता आता विशेष न्यायालयात पूर्ण झाली आहे.

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पला अटक केली.

इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमुळे ईडीच्या तपास प्रकरणात रवी उप्पलला बराच काळ दुबई तुरुंगात ठेवण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणात अटकेच्या नियमांनुसार, भारतीय दूतावासाने दुबई न्यायालयात प्रत्यार्पणाची प्रक्रिया 60 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागते. त्यानंतरच त्याला भारतात आणता येईल.

हे सुद्धा वाचा

रवी उप्पल गेल्या 32 दिवसांपासून दुबईच्या तुरुंगात आहे. रायपूरच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केंद्रीय एजन्सी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे.

विदेशातून आरोपीला आणण्याची प्रक्रिया

याबाबत ईडीचे विशेष सरकारी वकील म्हणाले की, न्यायालयाने प्रत्यार्पणाचा अर्ज स्वीकारला आहे. पीएमएलए कलम 59 अन्वये प्रत्यार्पणाबाबतचा हा आदेश मान्य केल्यानंतर अरबी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांची प्रत विशेष न्यायालयात सादर करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने दुबई येथील न्यायालयाकडे प्रत्यार्पणासाठी विनंती पत्र जारी केले आहे.

दुबई न्यायालय संमती देईल

ईडीतर्फे हा संपूर्ण कायदेशीर रेकॉर्ड परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येईल, त्यानंतर तो परराष्ट्र मंत्रालयाकडून दुबईतील भारतीय उच्चायुक्तांकडे सुपूर्द केला जाईल. भारतीय उच्चायुक्तालय हे दस्तऐवज दुबईच्या सक्षम न्यायालयात सादर करेल, त्यानंतर दुबई न्यायालयाकडून प्रत्यार्पणासाठी कायदेशीर संमती दिली जाईल.

नेत्यांच्या वाढणार अडचणी ?

त्यानंतरच ED रवी उप्पलला ताब्यात घेऊन त्याला भारतात आणू शकेल. छत्तीसगडसह देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीच्या या मोठ्या गडबडीत रवी उप्पल यांच्याकडून पैसे कधी आणि कसे हस्तांतरित केले गेले याची माहिती मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या प्रकरणाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीही वाढू शकतात.