नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : महादेव बेटींग एप ( Mahadev Betting App ) प्रकरणात अनेक नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी या महादेव एपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर ( Saurabh Chandrakar ) याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Dawood Ibrahim ) भाऊ मुश्तकीम याच्याशी हात मिळवून हा व्यवसाय उभा केल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या ( ED ) तपासात उघडकीस आले आहे. सौरभ आणि मुश्तकीम यांनी मिळून हे गेम एप लॉंच केले आहे. त्यांनी ‘खेलोयार’ नावाने आणखी एक बेटींग एप लॉंच केले असून ते भारत आणि पाकिस्तानातून चालविले जात असल्याचे उघड झाले आहे.
खेलोयार या बेटींग एपमधून सौरभ चंद्राकर आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ मुश्तकीम हे दोघे करोडोची कमाई करीत आहेत. मुश्तकीत याने सौरभ याला स्वत: ची सुरक्षा देखील पुरविली असल्याचे उघड झाले आहे. दुबईतून हे दोघे मिळून हे बेटींग एप चालवितात. त्यामुळे त्यांना रोजची कोट्यवधी रुपयांची कमाई होत असल्याचे उघड झाले आहे. छत्तीसगढ येथील रहीवासी सौरभ चंद्राकर याने दुबईला जाऊन ऑनलाईन सट्टेबाजीचे एप सुरु केले होते. या एपचे नाव महादेव गेमिंग-बेटींग एप असे ठेवले होते. या प्रकरण सक्तवसुली संचालनालया ( ईडी ) ने सुरु केली आहे. अनेक राज्यात या प्रकरणी छापेमारी सुरु आहे.
महादेव बुक एपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर याचे लग्न संयुक्त अरब अमिरातीत फेब्रुवारीमध्ये झाले होते. या लग्नाचा इवेंट भव्य दिव्य करण्यात आला होता. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक अभिनेते आणि गायकांनी हजेरी लावली होती. या लग्नावर हवालाच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांहून अधिक पैसा खर्च केला होता. तसेच कौटुंबिक सदस्यांना नागपूरहून युएईला नेण्यासाठी भाड्याने प्रायव्हेट जेट विमाने बुक करण्यात आली होती. ईडीने मुंबई, भोपाळ आणि कोलकाता येथे छापे टाकून तपास सुरु केला आहे. तपासात सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल नावाने आरोपींनी युएईमध्ये अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. दोघेही जण अवैध प्रकारे कमावलेल्या पैशाचे प्रदर्शन करीत आहेत.
छत्तीसगढच्या सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला सौरभ याने 2018 पर्यंत भिलाईत ज्यूस सेंटर चालविले होते. त्यानंतर तो ऑनलाईन सट्टेबाजी एपवर सट्टा लावू लागला. यात तो 15 लाख हरला होता. त्याचा मित्र रवी उप्पल देखील सामान्य कुटुंबातला आहे. तोही छोटी-मोटी कामे करायचा. त्यानेही सट्टेबाजी करणाऱ्या एपमध्ये 10 लाखाहून अधिक रक्कम गमावली होती. सट्टेबाजी सिंडीकेटमधून वसुलीसाठी दबाव आल्यानंतर दोघे दुबईला पळाले. त्यानंतर छोटीमोठी कामे करीत त्यांनी नंतर एप लॉंच केले. युरोपातील काही सॉफ्टवेअर्स कोडर्सच्या मदतीने हे एप बनविले. कोविड काळात 2020 मध्ये त्यांनी या एपमधून भरपूर पैसा कमविला.