मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप (Mahadev Betting Scam) केसची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांना चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने समन्स बजावल्याने हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) , श्रद्धा कपूर, कपिल शर्मा यांच्यासह अनेकांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. या केसप्रकरणी ईडीने आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुनील आणि अनिल दम्मानी हे दोघे भाऊ तसेच एएसआय चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर यांचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणात बॉलिवूड कलाकारांची नावं यायला लागल्यापासून अनेकांना बरेच प्रश्न पडत आहेत, उत्सुकताही वाढली आहे. ‘महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप’ नेमकं आहे तरी काय, भारतात याचं जाळं नेमकं कसं पसरलं, याच्यामागचा सूत्रधार कोण ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत.
छत्तीसगडच्या भिलाई येथील रहिवासी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी दुबईत बसून महादेव बेटिंग ॲप ऑपरेट केले. हे दोघेही महादेव बेटिंग ॲपचे प्रमोटर होते. मलेशिया, थायलंड, भारत आणि UAE मधील वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये कॉल सेंटर्स उघडण्यात आली, ज्याद्वारे अनेक सब्सिडरी ॲप्स तयार करून ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती. महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे लाँडरिंग केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
भारतात कसं पसरलं महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपचं जाळं ?
UAE मध्ये बसून सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल हे ॲप भारतात कसं चालवत होते, ते समजून घेऊया. खरं तर, छत्तीसगडसह भारतातील विविध राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये या ॲपची सुमारे 30 कॉल सेंटर्स उघडण्यात आली होती. ही कॉलसेंटर एकाच चेनचा हिस्सा बनवून अतिशय चलाखीने चालवली जात होती. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे त्यांचे दोन जवळचे सहकारी अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने भारतात हे ॲप चालवत होते.
सर्वात पहिले अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने KYC द्वारे मोठ्या प्रमाणात बेनामी बँक अकाऊंट्स उघडण्यात आली. मेन प्रमोटर सौरभ चंद्राकर, रवि उप्पल आणि पॅनेल ऑपरेटर (कॉल सेंटर ऑपरेटर) यांच्या संगनमताने हे बेटिंग सिंडिकेट ॲप चालवण्यात येत होतं. हे चालवण्यासाठी पोलिस, राजकारणी आणि ब्युरोक्रॅट्सनाही भागीदारी देण्यात आली होती.
मात्र या सिंडिकेटमध्ये अनिल दम्मानी यांची भूमिका केवळ ऑनलाइन बेटिंग ॲप चालवण्याचीच नव्हती. तर हवालाच्या माध्यमातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणावर बेटिंग ॲपमध्ये वापरणे, या ॲपचा फायदा घेणारे पोलिस, राजकारणी आणि नोकरशहा यांच्याकडे पैसे पोहोचवणे, हे कामही तो करायचा. कोणीही यावर बोट उचलून नये, म्हणून काळजी घेण्याचे काम त्याचे होते.
यूएईमध्ये बसलेले प्रमोटर्स हवालाच्या माध्यमातून छत्तीसगडमधील अनिल आणि सुनील दम्मानी यांना मोठी रक्कम पाठवायचे. त्यानंतर, हे पैसे छत्तीसगड पोलिसांचे ASI चंद्रभूषण वर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यायचे. छत्तीसगड पोलिसांमध्ये तैनात असलेले पोलिस अधिकारी, ब्युरोक्रॅट्स आणि राजकीय प्रभाव असलेल्या लोकांपर्यंत हे पैसे ( लाच म्हणून) पोहोचवण्याची जबाबारी वर्मा याच्यावर होती. हवालाद्वारे हे पैसे रायपूर येथील सदर बाजारातील एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात यायचे.
इतक्या रकमेचं झालं ट्रान्झॅक्शन
याप्रकरणी अनिल दम्मानी याची चौकशी करण्यात आली असता, त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. गेल्या दोन-तीन वर्षांत तो आणि त्याचा भाऊ सुनील यांनी, रवी उप्पलच्या सांगण्यावरून हवालाद्वारे 60 ते 65 कोटी रुपयांचे व्यवहार केले, त्यापैकी त्याला 6 लाख रुपये मिळाले. ते दोघेही त्यांच्या ज्वेलरी शॉपमधून हवालाचा व्यवसाय चालवतात, असेही अनिल याने सांगितले. अनिल आणि सुनील हे दोघे भाऊ यूएईमध्ये बसलेल्या रवी उप्पलच्या सतत संपर्कात होते, असे त्यांच्या सीडीआरमधून (CDR) समोर आले.
महादेव बेटिंग ॲपचं बॉलीवूड कनेक्शन ?
खरंतर, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सौरभ चंद्राकरने लग्न केलं. दुबईत हा लग्नसोहळा पार पडला. त्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चार्टर्ड प्लेनने बोलावण्यात आलं. त्यांच्यासोबतच पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांनाही बोलावलं होतं.
दरम्यान, येणाऱ्या काळात ईडी आणखी काही कलाकारांना समन्स बजावू शकते असं सांगितलं जात आहे. कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट, भारती सिंह, सनी लिओनीसही अनेक स्टार्स ईडीच्या रडावर आहे. या परफॉर्मन्सच्या बदल्यात सर्व कलाकारांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, रणबीर कपूरवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या सपोर्टिंग ॲपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच दुबईतील परफॉर्मन्समध्ये सहभागी असलेल्या अनेक कलाकार ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून 417 कोटींची संपत्ती जप्त केली होती.