अहमदनगर : 2019 मध्ये ‘मिस्टर इंडिया’चा किताब पटकवणारा अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याच्या मृत्यू प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात असलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक बसून सप्टेंबर महिन्यात 30 वर्षीय अजिंक्यचा मृत्यू झाला होता. ग्रिलला चारही बोटं चिकटल्यामुळे तो ऑन द स्पॉट गेल्याचं वडिलांनी सांगितलं होतं.
सहा जणांवर गुन्हा
महावितरण आणि केबल ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केला होता. जवळपास सव्वा महिन्यानंतर या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टीव्ही केबल मालक, महावितरणचे वायरमन, ज्युनिअर इंजिनिअर, केबल पुरवठादार, टीव्ही केबल पुरवठादार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर शहरातील विनायक नगर परिसरात गायकवाड कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
कोण होता अजिंक्य गायकवाड?
अजिंक्य गायकवाड वेगवेगळ्या खेळात निपुण होता. या बरोबरच 2019 मध्ये त्याने दिल्ली येथे झालेल्या ‘मिस्टर इंडिया ग्लोबल’ स्पर्धेत सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘मिस्टर इंडिया’चा किताब पटकावला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे.
वडिलांनी काय सांगितलं होतं?
“त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अजिंक्य आईसोबत सोफ्यावर बोलत बसला होता. हॉलमध्ये चुर-चुर आवाज येत होता. केबल हायटेन्शन वायर घरामध्ये आली होती. खिडकीला ती लटकत होती. आमच्याही लक्षात नाही, की तिथे शॉर्ट उतरेल. आमच्या घरामध्ये डिश होती, त्यामुळे त्या केबलचा मी कधीच उपयोग केलेला नाही. पाऊस-वाऱ्यामुळे खिडकीला लटकताना वायरचं स्पार्किंग व्हायचं. म्हणून अजिंक्य पाहायला गेला. तिथे टीव्हीचे बोर्ड होते. चुकून त्याचा ग्रिलला हात लागला आणि चारही बोटं चिकटली. जोराचा धक्का बसला आणि ऑन द स्पॉट गेला.” अशी माहिती अजिंक्यच्या वडिलांनी दिली होती.
“यामध्ये पूर्णपणे एमएसईबी आणि केबल चालकाची चूक आहे. माझा मुलगा गेला, तो काही परत येणार नाही. हरहुन्नरी मुलगा गेला. कोणत्याही मात्या-पित्यावर ही वेळ येऊ नये, शासनाने हे प्रकार बंद केले पाहिजेत. माझं सरकार असून माझ्यावर ही वेळ आली, याचंच मला दुःख वाटतं” अशा भावना अजिंक्यच्या वडिलांनी व्यक्त केल्या होत्या
वर्ध्यात कुलर साफ करताना शॉक
कुलरची साफसफाई करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी वर्ध्यात उघडकीस आली होती. अमित बोरकर असं मृत तरुणाचं नाव होतं. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळील हिवरा हाडके येथे ही घटना घडली होती. पाणी भरूनसुद्धा कुलरमधून हवा येत नसल्यामुळे त्याने कुलरची साफसफाई करायला सुरुवात केली होती, त्यावेळी विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कुलरलाच चिकटला होता.
संबंधित बातम्या :
घरात एकटी असताना विजेचा धक्का, बुलडाण्यात 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
सफाई करताना कुलरला चिकटला, वडिलांनाही विजेचा धक्का, वर्ध्यात तरुणाचा मृत्यू