अहमदनगर : बदलीनंतरही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Deore) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे आज सकाळी 11 वाजता देवरेंविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करणारी ज्योती देवरेंची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य रंगले होते. आता देवरे यांची जळगाव येथे बदली करण्याचे आदेश निघाले आहेत.
आत्महत्येचा इशारा
अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईड ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देवरेंनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदारावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. यातून सुटण्यासाठी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.
आत्महत्येचा कोणताही विचार डोक्यात नाही, देवरेंचं लेखी आश्वासन
त्यानंतर, ज्योती देवरे यांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी मी आत्महत्या करणार नाही अशी लेखी हमी अहमदनगर पोलीस प्रशासनाला दिली होती. “पोलीस निरीक्षकांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. तेव्हाही त्यांनी मी असं काहीही करणार नाही असं नमूद केलं. कधीतरी असं बोललं गेलं होतं, पण आता असा कोणताही विचार माझ्या डोक्यात नाही, असं लेखी आश्वासन देवरे यांनी दिल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं होतं.
ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचा ठपका
तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, त्यानंतर देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या अहवालात तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला होता.
तहसीलदार देवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक घोटाळे उघड झाल्याचं बोललं जातं. देवरे यांनी अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय वाळू साठ्यातही गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, कोविड सेंटर, हॉस्पिटल विरोधात चौकशी करून कागदपत्रे सादर न करणे, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवणे आणि आपली कामाची जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, कामात हयगय करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे असे अनेक गंभीर आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर करण्यात आलेत.
निलेश लंकेंचे आरोप काय
“तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून केविलवाणा प्रयत्न केला. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा प्रयत्न आहे” असा आरोप आमदार निलेश लंके यांनी केला होता.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली, चित्रा वाघ यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे