अहमदनगर : पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेज करत तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने भिंगार पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे सासर बीड जिल्ह्यातील असून हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर शहराजवळील भिंगार येथील महिलेचा विवाह बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील खालीद ख्वाजा सय्यद याच्याशी झाला. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली. मात्र विवाहानंतर काही दिवसांतच नोकरीसाठी माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून सासरी तिचा छळ करण्यात येऊ लागला.
सासरहून घराबाहेर काढले
महिलेचा मानसिक छळ करण्यासोबतच तिला मारहाणही करण्यात आली होती. तिला उपाशीपोटीही ठेवले जात होते. एप्रिल 2018 ते ऑगस्ट 2019 पर्यंत सातत्याने हा छळ सुरू होता. तरीही तिने पैसे आणले नाहीत. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले.
सततच्या छळाला कंटाळून तीही माहेरी निघून आली. त्यानंतर पतीने तिला एसएमएस पाठवात तलाक दिला. अखेर या प्रकरणी मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियामातील कलमांच्या अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहेत पतीचे मेसेज?
मै मेरे मा-बाप, भाई, दोनो मामू, मुमानी, खाला खालू, शाप्या सब के मशहरेसे तुझे तीन तलाक देता हू तेरे मू पे
तलाक तलाक तलाक
तलाक
दस हजार बार बोला
तू सिर्फ बेटिया पैदा कर सकती है और मै नफरत करता हू उनसे
पैसे भी ला ला बोले
देशातील पहिला गुन्हा ठाण्यात
तिहेरी तलाक कायदा संमत झाल्यानंतर 2019 मध्ये देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला होता. पतीने व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली होती. ठाण्यातील कौसा मुंब्रा भागात राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 35 वर्षीय पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
तिहेरी तलाक विरोधात देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात, MBA महिलेची तक्रार