अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी फरार झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना कान्हू मोरे पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची सहा एप्रिल रोजी अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
आरोपी कान्हू मोरे हा कोरोनाबाधित झाल्याने त्याला 16 ऑगस्ट रोजी उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होताच तो पोलीस बंदोबस्तात असतानाही जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे. सध्या त्याच्या शोधकार्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याने दातीर यांच्या हत्येची कबुलीही दिली होती.
रोहिदास दातीर यांनी पोलिसात तक्रार केली होती
रोहिदास दातीर यांचं राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही केली होती, असा दावा त्यांच्या हत्येनंतर माजी आमदार शिवाजीराव कार्डिले यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
पत्रकाराची हत्या; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?
अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला