औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्येचे गूढ (Aurangabad Dr. Rajan Shinde Murder Case) सातव्या दिवशी देखील कायम आहे. त्यांच्या घरालगत असलेल्या विहिरीतून पाणी काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कालपासून सकाळपर्यंत 45 फुटापर्यंत पाणी काढण्यात आले. हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी पाण्याचा उपसा सुरु आहे.
काय आहे राजन शिंदे हत्या प्रकरण?
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून झाला होता. हा खून कोणी केला, याचा तपास करण्यासाठी शिंदे यांचे निकटवर्तीय, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, महाविद्यालयातील कर्मचारी अशा सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
एकाने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तसेच आरोपीने खून करून ते शस्त्र घराजवळीलच विहिरीत टाकल्याचे सांगितले. विहीर जुनी असल्याने आणखी सात फूट खोल पाणी असल्याचा अंदाज कर्मचाऱ्यांनी बांधला आहे. ही विहीर अनेक वर्षांपासून पडीक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. त्यामुळे त्यात गॅसही असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघव, अजबसिंग जारावाल, मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
पाण्याचा उपसा कधीपासून सुरु?
डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसा शनिवार 16 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरु करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. यात आणखी एक मोटार वाढवण्यात आली आहे. यामुळे लवकरच पाणी उपसा होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी आठ ते दहा कर्मचारी काम करत असून संपूर्ण पाणी उपसल्याशिवाय शस्त्र सापडणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आरोपीच्या जबाबावर पोलिस समाधानी नाही
डॉ. राजन शिंदे यांच्या निकटवर्तीयाने, तो हिटलरसारखे वागत होता, त्यामुळे एकदाचे त्याला संपवले, अशी कबुली दिल्याची माहिती आहे. परंतु फक्त या कारणामुळे डॉ. शिंदे यांचा एवढा निर्घृण खून कसा केला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलीसही या जबाबावर समाधानी नाहीत.
गुन्ह्याची उकल लवकरच
अनेक गंभीर गुन्ह्यांत सबळ पुरावा मिळाला नाही तर परिस्थितीजन्य पुराव्याआधारे संशयितांना ताब्यात घेतले जाते. नंतर संशयितांना पोलिसी खाक्या दाखवून कबुलीजबाब वदवून घेतला जातो. प्रा. शिंदे प्रकरणात ही पद्धत वापरली गेली नाही. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले, ‘गुन्हा उघडकीस आणण्यात काही अडचणी होत्या. पण आता आम्ही आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नाही. फक्त थोडा काळ वाट पाहा.’, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
तपासावरही प्रश्नांचे मोहोळ
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. राजन शिंदे यांचा मुलगा रोहितने पोलिसांना संबंधित विहिरीत पुरावे टाकल्याचे सां होता. मात्र शुक्रवारनंतर या विहिरीतील पाणी उपसण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. पण या कामासाठी सहा दिवसांचा वेळ पोलिसांनी का घेतला, हे अजूनही गुपितच आहे. तसेच डॉ. शिंदे यांच्या पत्नी प्रा. मनीषा शिंदे यांच्या जबाबात मृतदेह सकाळी सात वाजता पाहिल्याचे म्हटले. प्रत्यक्षात उस्मानाबाद उपकेंद्रातील सहाय्यक प्राध्यापकाला पहाटे पाच वाजताच फोन करून त्यांनी पतीचा खून झाल्याचे सांगितले. या तफावतीकडे पोलीस दुर्लक्ष का करत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. वडील रक्ताच्या थारोळ्यात असताना अल्पवयीन म्हटला जाणारा मुलगा रोहित व मुलगी चैताली पहाटे रुग्णवाहिका आणण्यासाठी गेले, यावर पोलिसांचा विश्वास कसा बसला, असाही एक प्रश्न आहे.
संबंधित बातम्या :
डॉ. शिंदे खून: पत्नीच्या जबाबात विसंगती, असंख्य कॉल रेकॉर्ड्स पिंजून काढले, क्लू अजून दूरच…