सांगली : सांगली बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कोल्हापूर येथील एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. तिच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातल्या बस स्थानक परिसरामध्ये पर्स आणि पाकीट चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. या बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू असताना शहरातल्या शिवाजी मंडई या ठिकाणी सापळा लावला असता, एक महिला संशयित आढळून आली.
जयसिंगपूर आणि हातकणंगले स्टँडवर चोऱ्या
तिला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, गर्दीचा फायदा घेऊन एसटीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे सांगली त्याचबरोबर जयसिंगपूर आणि हातकणंगले बस स्थानक या ठिकाणी आपल्या तीन महिला साथीदारांच्या समवेत चोरी करत असल्याची कबुली दिली आहे.
एक लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
त्यानंतर त्या संशयित महिलेकडून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या महिलेकडून दोन चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.
संबंधित बातम्या :
जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली