सांगली : दोघा भावांसह तिघा जणांवर सशस्त्र हल्ला (Attack) करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मारोळी आणि सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे वनक्षेत्रात हा प्रकार घडला. जंगलात दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार (Sword Attack) करुन तिघांचे हात-पाय तोडल्याचा आरोप आहे. भावकीतील अंतर्गत वाद आणि शेत जमिनीवरुन सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समोर येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी आणि जत तालुक्यातील जाडरबोबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असतो. जाडरबोबलाद येथील बरुर यांच्या भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
रविवारी विठ्ठल बरुर, दयानंद बरूर आणि महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढवला.
हल्ल्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी आणि मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोरांचा जखमींबरोबर मागील काही दिवसांपासून जमिनीवरुन वाद सुरु आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरूनच ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :
सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला
वर्गात शिक्षिकेसमोरच बारावीच्या विद्यार्थ्यांची हमरी-तुमरी, अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या
मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला